परीक्षा विभागाचा सावध पवित्रा
By Admin | Updated: November 7, 2014 00:42 IST2014-11-07T00:42:38+5:302014-11-07T00:42:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. या परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारे चूक होऊ नये किंवा परीक्षा केंद्रावर संभ्रमातून पेपरफुटीसारख्या घटना होऊ नये

परीक्षा विभागाचा सावध पवित्रा
नागपूर विद्यापीठ : हिवाळी परीक्षांमध्ये केंद्र प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. या परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारे चूक होऊ नये किंवा परीक्षा केंद्रावर संभ्रमातून पेपरफुटीसारख्या घटना होऊ नये याकरिता परीक्षा विभागाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. परीक्षा नियंत्रकांनी मागील आठवड्यात अधिसूचना जारी करून विद्यापीठाच्याच संकेतस्थळावरील वेळापत्रकाला अंतिम मानण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मागील काही वर्षांमध्ये परीक्षा केंद्र आणि विद्यापीठातील समन्वयाच्या अभावामुळे चुकीने भलत्याच तारखेचे पेपर वाटणे, दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या पेपरचा गठ्ठा फोडणे अशा प्रकारचे प्रकार दिसून आले. यामुळे विद्यापीठाला पुन्हा पेपर काढावे लागले होते व अकारण आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
यंदा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची धुरा प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांच्याकडे आहे. वेळापत्रकावरुन कुठल्याही प्रकारे गोंधळ होऊ नये यासाठी त्यांनी मागील आठवड्यात अधिसूचना काढली. विद्यापीठाकडून देण्यात आलेले आॅनलाईन प्रवेशपत्र व हिवाळी परीक्षांच्या वेळापत्रकात तफावत असेल तर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक अंतिम मानण्यात यावे, अशी सूचना या अधिसूचनेत देण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रप्रमुखांना यासंदर्भात संपर्क करण्यात आल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. परीक्षा नियंत्रकांशी संपर्क होऊ शकला नाही.
साधारणत: परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवरील हलगर्जीमुळे विद्यापीठाला फटका बसल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढीस लागल्या आहेत. चुकीच्या पेपरचे पाकीट उघडणे, परीक्षा केंद्रांवरील गैरसुविधा इत्यादींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. यंदा असे प्रकार घडू नयेत याकरीता परीक्षा विभागाने सर्व परीक्षा केंद्रांना कडक सूचना केल्या आहे. परीक्षा केंद्राकडून चूक झाली तर संबंधित केंद्रप्रमुखांवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)