मानसिक तणाव ठरतोय अपघाताचे कारण
By Admin | Updated: June 23, 2014 01:23 IST2014-06-23T01:23:23+5:302014-06-23T01:23:23+5:30
स्टार बसच्या वाढत्या अपघातामुळे सर्वसामान्यासाठी रस्त्यांवरून चालणे भीतीदायक झाले आहे. महाराज बाग रोडवर तर प्रवाशांना नेहमीच स्टार बसच्या धडकेला सामोरा जावे लागते.

मानसिक तणाव ठरतोय अपघाताचे कारण
स्टार बस : चालक-कंडक्टर अप्रशिक्षित
नागपूर : स्टार बसच्या वाढत्या अपघातामुळे सर्वसामान्यासाठी रस्त्यांवरून चालणे भीतीदायक झाले आहे. महाराज बाग रोडवर तर प्रवाशांना नेहमीच स्टार बसच्या धडकेला सामोरा जावे लागते. या अपघातासाठी खटारा बस हे कारण असले तरी ड्रायव्हर व कंडक्टर प्रशिक्षित नसणे आणि ते नेहमी तणावात असल्याचे कारणसुद्धा पुढे आले आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारीसुद्धा महाराज बाग रोडवर स्टार बसच्या धडकेमुळे काही विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झाले. लोकमतने याबाबत स्टार बस चालक व कंडक्टरशी संपर्क साधून कारण माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला असता अगोदर कुणीही बोलायला तयार नव्हते. परंतु नंतर नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी उघडपणे स्टार बसचे व्यवस्थापन करणाऱ्या वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लि.च्या विरुद्ध आपला रोष व्यक्त केला. प्रत्येक स्टार बस चालक व कंडक्टरने सांगितले की, त्यांची नोकरी राहील की नाही, याची नेहमीच चिंता लागलेली असते. मानसिक तणावामुळे सुद्धा अपघात होतात. तसेच स्टार बसची स्थितीसुद्धा चांगली नाही. खटारा गाड्या चालवाव्या लागत आहेत. अपघाताचे हे एक मुख्य कारण असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले.
वेतन कमी, कसे मिळणार
अनुभवी ड्रायव्हर
स्टार बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टरची नोकरी स्थायी नाही. त्यातही एखाद दुसरा अनुपस्थित राहिल्यास त्याला नोकरीतून हात धुवावे लागतात. वेतन कमी असल्याने अनुभवी ड्रायव्हर यायला तयार होत नाहीत. त्यामुळे अप्रशिक्षित ड्रायव्हरच्या भरवशावर स्टार बस चालविली जात आहे. ४७० स्टार बस्ेसपैकी २०० बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक ड्रायव्हर, कंडक्टर, मॅकेनिक आदींना नोकरी गमवावी लागली आहे. दररोज पाच ते सहा कर्मचारी नोकरीतून काढून टाकल्याची तक्रार घेऊन येतात. त्याची कारणे अतिशय छोटी असतात. यामुळे सुद्धा अपघात वाढत असल्याचे मनपा परिवहन समितीचे सभापती बंडू राऊत यांनी सांगितले.
२० पेक्षा अधिकांचे गेले जीव
शहरात स्टार बस सेवा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून शेकडो अपघात झाले आहेत. यामध्ये २० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातासाठी बहुतांश प्रकरणात ड्रायव्हरचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. जेव्हा शहरात एसटी बस चालत होत्या. तेव्हा अपघातांचे प्रमाण नगण्य होते. २००८ मध्ये शहरात स्टार बस सेवा सुरू झाली.
कधीही नोकरी जाण्याची भीती
स्टार बस ड्रायव्हर राम मेश्राम (बदललेले नाव) यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. ते सुरुवातीला बोलायलाच तयार नव्हते. नंतर अनौपचारिक चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, एक दिवसाची सुटी किंवा तासभर उशीर झाला तरी नोकरी गमवावी लागते. त्यामुळे नोकरी जाण्याची नेहमीच भीती असते. या मानसिक तणावामुळे सुद्धा अनेकदा अपघात होतात.
ट्रॅफिक नव्हे पैशाचा हिशेब आवश्यक
स्टार बस कंडक्टर सुनील (बदललेले नाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार तिकीट कापताना एकेक पैशाचा हिशेब द्यावा लागतो. एक रुपया सुद्धा इकडचा तिकडे झाला तर पगारातून कापला जातो. अगोदरच वेतन कमी आहे. त्यातही पगारातून कपात होत असल्याने ती होऊ नये याची चिंता सुद्धा लागली असते. त्यामुळे पैशाच्या हिशेबामुळे बसच्या आजूबाजूच्या ट्रॅफिककडे दुर्लक्ष होते.