लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : मध्य प्रदेशातून काटाेलमार्गे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात नेला जाणारा विदेशी दारूचा साठा (१०० पेट्या) पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या कारवाईमध्ये दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दारूसाठा व वाहन असा एकूण १६ लाख ४१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई काटाेल परिसरात गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शिवम मुकेश शर्मा (२५, बालाजी चाैक, यवतमाळ) व गिरीधर दशरथ विठाेले (३९, रा. भामराजा, यवतमाळ), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काटाेल परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना मध्य प्रदेशातील वडचिचाेली (ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा) येथून काटाेलमार्गे वर्धा जिल्ह्याच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने काटाेल-मूर्ती-वर्धा मार्गावरील परसाेडी शिवारात नाकाबंदी केली. यात पाेलिसांनी वर्धा जिल्ह्याच्या दिशेने जाणारे एमएच-१४/एफएम-९४७८ क्रमांकाचे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली.
त्यांना त्या वाहनात विदेशी दारूच्या १०० पेट्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध विक्रीसाठी नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी वाहनातील दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ४१ हजार २०० रुपयांच्या विदेशी दारूच्या १०० पेट्यांमधील ५,४६० बाटल्या आणि पाच लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १६ लाख ४१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, हवालदार राजेंद्र सनाेडिया, दुर्गाप्रसाद पारडे, विजय डाेंगरे, रेवतकर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
...
मध्य प्रदेशातील उत्पादन
या दारूचे उत्पादन मध्य प्रदेशात करण्यात आले आहे. या दारूच्या १०० पेट्या छाेट्या मालवाहू वाहनाद्वारे नेल्या जात हाेत्या. मध्य प्रदेशातील दारूची काटाेल व नरखेड तालुक्यातून वर्धा जिल्ह्यात पूर्वी नेहमीच चाेरटी वाहतूक केली जायची. या वाहतुकीचे मार्गही ठरलेले आहेत. विदेशी दारूचा हा साठा संजय तायवाडे, रा. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश याच्या सांगण्यावरून वर्धा जिल्ह्यात नेला जात हाेता. त्याच्याच सांगण्यावरून आराेपींनी दारूच्या पेट्या वडचिचाेली येथील या वाहनात टाकल्या हाेत्या, असेही आराेपींनी पाेलिसांना सांगितले. लाॅकडाऊन काळात अवैध दारू विक्री वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध दारू विक्री व वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवून आहे.