A casual leave if it's three days late | तीन दिवस उशीर झाल्यास एक नैमित्तीक रजा

तीन दिवस उशीर झाल्यास एक नैमित्तीक रजा

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाचे आदेश


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसाचा आठवडा सुरू होत आहे. त्यामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांना आठवड्यातून केवळ पाचच दिवस कार्यालयीन काम करायचे आहे. मात्र तीन दिवस उशीर आढळून आल्यास एक दिवसाची नैमित्तीक रजा कापण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
राज्य शासनाने २९ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसाचा आठवडा लागू केला. त्यांच्या दररोजच्या कामाची वेळ ४५ मिनिटाने वाढविली आहे. आठवड्यात दोन दिवस सुट्या मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळा पाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक यंत्रावरून होईल. सर्व विभागांमध्ये बायोमेट्रीक यंत्र आवश्यक केले आहे. विशेष म्हणजे विभाग प्रमुखांना वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत तर कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची संपूर्ण जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर टाकली आहे. परिणामी, कोणताही कर्मचारी-अधिकारी कार्यालयीन वेळेत येणार नाही व वेळेपूर्वी कार्यालय सोडतील, अशा प्रकरणी वेळीच दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तसेच प्रत्येक कार्यालय प्रमुख कार्यालयीन उपस्थितीबाबत आणि त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अहवाल दर महिन्यात सादर करणे बंधनकारक केले आहे. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी दिल्या आहेत.

Web Title: A casual leave if it's three days late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.