रुग्णाच्या नातेवाईकाची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST2021-02-15T04:07:39+5:302021-02-15T04:07:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वृद्ध रुग्णाच्या पत्नीच्या बॅगमधून दीड लाखाची रोकड असलेली छोटी पर्स चोरट्याने लंपास केली. शनिवारी ...

रुग्णाच्या नातेवाईकाची रोकड लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वृद्ध रुग्णाच्या पत्नीच्या बॅगमधून दीड लाखाची रोकड असलेली छोटी पर्स चोरट्याने लंपास केली. शनिवारी रात्री ९च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी इस्पितळाच्या आवारात ही घटना घडली.
फिर्यादी अनुप अरुण वदनलवार (वय ३८) हे चंद्रपूरचे रहिवासी होय. त्यांचे मामा अनिल ठाकूरवार (वय ६३) हे निवृत्त शिक्षक असून ते राजुऱ्यात (जि. चंद्रपूर) राहतात. त्यांना स्नेहनगरातील एका खासगी इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नातेवाईक त्यांना बघण्यासाठी शनिवारी रात्री रुग्णालयात आले होते. अनिल ठाकूरवार यांच्या पत्नी रजनी ठाकूरवार (वय ५८) या इस्पितळाच्या आवारात बसल्या होत्या. काही वेळेनंतर त्यांनी आपली बॅग तपासली असता दीड लाख रुपये ठेवलेली छोटी पर्स बॅगमधून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ही बाब आपल्या नातेवाइकांना सांगितली. इस्पितळात शोधाशोध करण्यात आली. रोकड असलेल्या पर्सबाबत कुणीच काही माहिती दिली नसल्याने अखेर प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक पेठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह इस्पितळात धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, फुटेजमध्ये स्पष्ट काही दिसत नसल्याने चोरट्याचा त्यावेळी छडा लागला नाही. वदनलवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.