ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माजी उपमहाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई
By योगेश पांडे | Updated: September 2, 2025 22:50 IST2025-09-02T22:49:30+5:302025-09-02T22:50:11+5:30
निविदा प्रक्रियेत अनिमिततेचा ठपका : चुलत भावाच्या कंपनीलाच दिले १.७१ कोटींचे कंत्राट

ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माजी उपमहाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल; सीबीआयची कारवाई
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीआयने नागपूरमधील अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीचे तत्कालीन उपमहाव्यवस्थापक दीपक लांबा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. २०२२ च्या निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याचा लांबावर आरोप होता. नियमांना बगल देत चुलत भावाच्या मालकीच्या खासगी फर्मला फायदा पोहोचविल्याचा ठपका ठेवत लांबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीआयने या प्रकरणासंदर्भात नागपूरमधील ऑटोमेशन इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ही खासगी फर्म आणि फर्मचा मालक मोहित ठोलिया यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीचे उपमुख्य दक्षता अधिकारी डी. के. टी. गुप्ता यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. लांबाने जुलै २०२२ मध्ये त्याचा चुलत भाऊ मोहित ठोलिया यास मालक दाखवून ऑटोमेशन इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल सर्व्हिसेसची स्थापना केली होती. चार महिन्यांच्या आता कंपनीला १.७१ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले. हे कंत्राट शेल मशीनमध्ये स्टील घटकांच्या मशिनिंगच्या कामाबाबत होते.
संबंधित कालावधीत लांबा यांच्याकडे शेल फोर्ज विभागाव्यतिरिक्त शेल मशीनची देखील जबाबदारी देण्यात आली होती. याचाच गैरफायदा उचलत त्यांनी संबंधित निविदेचे तांत्रिक तपशील तयार केले होते. ऑटोमेशन इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल सर्व्हिसेसने निविदा प्रक्रियेदरम्यान कंत्राट मिळविण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केले होते. ऑर्डर ऑटोमेशनमध्ये गेले असताना लांबाने इतर अधिकाऱ्यांसह सरकारी निधीचा गैरवापर केला.
याबाबत सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. त्या आधारावर चौकशी करत लांबा व ठोलियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने आरोपीच्या निवासस्थानासह चार ठिकाणी धाडी टाकत झडती घेतली.
आचारसंहितेचा केला भंग
सीसीएस आचारसंहितेच्या नियम ४ (३) नुसार, कोणताही सरकारी अधिकारी त्याच्या अधिकार क्षेत्रातील व्यवहारात कुटुंब सहभागी असेल तर त्या प्रकरणात संबंधित राहू शकत नाही. मात्र, लांबाने स्वत:च्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर केला. निविदाप्रक्रिया आटोपल्यानंतर व भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यावर लांबाची एक्सट्रूजन अँड फाउंड्रीमध्ये बदली करण्यात आली होती. तेथे त्याने निविदाप्रक्रिया नियमात असल्याचे दाखविण्याबाबत दबाव टाकला होता. तसेच काम झाले नाही तर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची धमकीदेखील दिली होती.
ऑर्डनन्स फॅक्टरीतील इतर अधिकारीदेखील सहभागी ?
तक्रारीनुसार या प्रकरणात ऑर्डनन्स फॅक्टरीतील इतरही काही अधिकारी लांबासोबत सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सीबीआयकडून सखोल तपास करण्यात येणार आहे.