उद्योगातील कामगार प्रदूषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: June 5, 2015 02:38 IST2015-06-05T02:38:31+5:302015-06-05T02:38:31+5:30
विकासाच्या नावावर राज्यात उद्योग येणे ही जमेची व समाधानाची बाब असली तरी प्रदूषण पसरविणाऱ्या उद्योगांची संख्या मात्र ६० टक्क्यांवर पोहोचली आहे.

उद्योगातील कामगार प्रदूषणाच्या विळख्यात
प्रदूषण करणाऱ्या उद्योगाच्या संख्येत वाढ : नियंत्रक मंडळाद्वारे कुठलीही ठोस कारवाई नाही
मंगेश व्यवहारे नागपूर
विकासाच्या नावावर राज्यात उद्योग येणे ही जमेची व समाधानाची बाब असली तरी प्रदूषण पसरविणाऱ्या उद्योगांची संख्या मात्र ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. या प्रदूषण पसरविणाऱ्या उद्योगात विदभार्तील नऊ टक्के कामगार काम करीत असल्याचे वास्तव एका अहवालातून समोर आले आहे.
सरकार उद्योगांसाठी देत असलेल्या सवलतीमुळे राज्यातील उद्योगांचा आलेख चढता आहे. मात्र, यातील ६० टक्के उद्योगातून टाकाऊ विषारी वायू ,अॅसिडसदृश द्रवपदार्थ बाहेर टाकले जात असून ते मानवजातीसाठी हानीकारक आहे. यासंदर्भात अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित उद्योगांना नोटीस पाठविल्या. मात्र, उद्योगांच्या संचालक मंडळाने त्या नोटीसलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. सद्यस्थितीत प्रदूषण निर्माण करणाऱ्या धोकादायक उद्योगांमध्ये सुमारे ५० टक्के कामगार काम करीत आहेत. यातील नऊ टक्के कामगार हे विदभार्तील आहेत.साखरनिर्मिती आणि शुद्धीकरण हायड्रोजनेटेड तेल, वनस्पती तूप व खाद्यतेल, स्पिरिटचे शुद्धीकरण कागद आणि कागदी बोर्डनिर्मिती कातडी उद्योग, पेट्रोलियम आणि कोळसा, औषधी आणि रासायनिक उत्पादने, सिमेंट, धातू उद्योग आणि औष्णिक वीजप्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते. या उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांकडे बघण्याचा सापत्न दृष्टिकोन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उदासीनतेमुळे या उद्योगांचे चांगलेच फावत आहे. हानीकारक टाकाऊ पदार्थ निर्माण करणाऱ्या उद्योगांचे प्रमाण आज ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही प्रदूषणासंदभार्तील कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रमुख यंत्रणा आहे. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या अखत्यारीतील ७७ हजार ७४६ कारखान्यांपैकी जलप्रदूषण करणारे २७ टक्के, वायुप्रदूषण करणारे २६ टक्के तर धोकादायक टाकाऊ पदार्थ बाहेर फेकणाऱ्या कारखान्यांचे प्रमाण ७ टक्के आहे. प्रदूषणात भर टाकणाऱ्या कारखान्यांची संख्या अवघ्या पाच वर्षात दुपटीने वाढली आहे.
प्रदूषणामुळे होणारे आजार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. समीर गोलावार यांनी विविध उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासात उद्योगानुसार कामगारांमध्ये आजार आढळले आहे. स्टोन क्रशिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होता. केमिकल कंपनीत काम करणाऱ्यांना कर्करोगाचा धोका असतो. धातू उद्योगातील कामगारांना रक्तपेशीचे आजार, कॉटनमध्ये श्वसनाचे आजार, साखर कारखान्यात डायगासोसीस आदी आजार मोठ्या प्रमाणात कामगारांना झाल्याचे निदर्शनास आले आहे.