विकास महात्मे, गिरीश व्यास आणि चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:32 IST2020-10-08T12:28:20+5:302020-10-08T12:32:11+5:30
Nagpur News Bawankule विना परवानगी नारे निदर्शने आणि आंदोलन केल्याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात खासदार विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विकास महात्मे, गिरीश व्यास आणि चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेकांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विना परवानगी नारे निदर्शने आणि आंदोलन केल्याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात खासदार विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांवर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी उपरोक्त मंडळी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचली. त्यांनी कृषी विधेयकाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार नारे निदर्शने करून सरकारी आदेशाच्या कागदपत्राची होळी केली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शासन प्रशासन नागरिकांना आवाहन, उपाययोजना करत आहे.
लोकप्रतिनिधी असूनही उपरोक्त मंडळींनी बेकायदा जमाव जमून शासकीय आदेशाचे उल्लंघन करून नारे निदर्शने केले. त्यामुळे नायक शिपाई नंदकिशोर देवगडे यांची तक्रार नोंदवून घेत सदर पोलिसांनी खा. महात्मे, आ. व्यास. माजी मंत्री बावनकुळे तसेच अजय अग्रवाल, अजय बोढारे, केशव बांदरे, अरविंद गजभिये आणि त्याच्यासोबतच्या कार्यकर्त्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.