लष्करातील काडतुसे गुंडाकडे

By Admin | Updated: May 29, 2014 03:23 IST2014-05-29T03:23:14+5:302014-05-29T03:23:14+5:30

लष्कर, पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणेच्या वापरातील तब्बल १९ जिवंत काडतुसे एका ..

Cartridge guns | लष्करातील काडतुसे गुंडाकडे

लष्करातील काडतुसे गुंडाकडे

नागपूर : लष्कर, पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणेच्या वापरातील तब्बल १९ जिवंत काडतुसे एका तडीपार गुन्हेगाराकडे आढळून आल्याने शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. आज गिट्टीखदान पोलिसांनी या गुन्हेगाराला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍याच्या न्यायालयात हजर करून त्याचा ३0 मेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.

सोहन ऊर्फ एल्या शेषराव मेश्राम (२९), असे या गुन्हेगाराचे नाव असून तो हुडकेश्‍वर रोड विठ्ठलवाडी येथील मूळ रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल रोडवरील जोरास कॉलनी येथील दिवाकर भैसारे याच्या घरी भाड्याने राहत होता. एल्या मेश्राम याने २0१0 मध्ये हुडकेश्‍वर भागात गोळीबार केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३0७ कलमान्वयेही गुन्हा दाखल आहे. एल्याने आपल्या गुन्हेगारी कृत्याने दहशत निर्माण केल्याने त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करून भंडारा येथे स्थानांतरित करण्यात आले होते. तडीपार असूनही तो नागपुरात वावरत होता.

एल्याजवळ अग्निशस्त्र असल्याच्या गुप्त माहितीवरून काल गिट्टीखदान पोलिसांच्या ताफ्याने जोरास कॉलनी येथील एल्याच्या खोलीवर धाड घातली. त्याच्या पलंगाखाली पोलिसांना पिस्तुल आणि 0.९ एमएमची १९ जिवंत काडतुसे आढळून आली. काडतुसे पाहून पोलिसांना धक्काच बसला. कारण ती लष्कर, पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणेच्या वापरात येणारी होती. पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करून भारतीय हत्यार कायद्याच्या ३, २५ , मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १४२, १३५ अन्वये एल्याला अटक केली.

पोलिसांनी आज आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍याच्या न्यायालयात हजर करून त्याचा ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मागितला.

आरोपीने पिस्तूल आणि काडतुसे कोठून प्राप्त केली. त्याने 0.९ एमएमची काडतुसे कोठून आणली, याबाबत सखोल चौकशी करणे आहे. आरोपीसोबत आणखी कुणी व्यक्ती जुळली आहे काय, त्याबाबत तपास करणे आहे, आदी मुद्दे पोलिसांकडून न्यायालयात उपस्थित करण्यात आले. आरोपीच्या वकिलानेही पोलीस कोठडी रिमांडला विरोध दर्शविला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला ३0 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अँड. पराग उके यांनी काम पाहिले.

Web Title: Cartridge guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.