पोलीस ठाण्यात आनंदोत्सव
By Admin | Updated: May 30, 2016 02:40 IST2016-05-30T02:40:53+5:302016-05-30T02:40:53+5:30
गुन्हेगारांना चिडणे, रागावणे आणि जोरजोरात बोलणे अन् कधी मारहाण तसेच रडारड हा पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीचा एक भाग.

पोलीस ठाण्यात आनंदोत्सव
वाढदिवस अन् लग्नाचा वाढदिवस : केक भरवला, पुष्पगुच्छही दिले
नागपूर : गुन्हेगारांना चिडणे, रागावणे आणि जोरजोरात बोलणे अन् कधी मारहाण तसेच रडारड हा पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीचा एक भाग. त्यामुळे बहुतांश पोलीस ठाण्यात नेहमीच रुक्ष अन् धाकधुकीचे वातावरण असते. तेथे जणू आनंदोत्सवाला स्थान नाहीच, असा सर्वसामान्यांचा(गैर)समज! मात्र सोनेगावचे ठाणेदार अशोक बागुल यांनी आज पोलीस ठाण्यात एक नव्हे, दोन नव्हे, तीन-तीन आनंदोत्सव एकाचवेळी साजरे केले. अनुकरणीय तेवढाच प्रशंसनीय अशा या छोटेखानी आनंदोत्सवाने सोनेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर सुखद वातावरण अनुभवले.
एरवी पोलीस कर्मचारी, गुन्हेगार, संशयित, तक्रारकर्ते त्यांच्याशी संबंधित वकील आणि फार तर एखादवेळी पत्रकार मंडळी पोलीस ठाण्यात आढळतात. तेच चिडणे, रागावणे आणि तीच मारहाण, तोच रडापडीचा अन् तक्रारीचा सूर. तेथील वातावरणाचा अनुभव आल्यामुळे म्हणा की ऐकल्यामुळे म्हणा पोलीस ठाण्यात सर्वसामान्य माणूसच काय, पोलिसांचे नातेवाईकही जायचे टाळतात. मात्र रविवारी सकाळपासूनच सोनेगाव पोलीस ठाण्यातील वातावरण उत्साहपूर्ण होते. ठाण्यात कार्यरत असलेल्या अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुलामुलींसह येथे हसतमुखाने हजर होते. प्रसंग होता, महिला कर्मचाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आणि हवालदार तसेच सहायक निरीक्षकांच्या वाढदिवसाचा!
ठाणेदार बागुल यांनी हे तीनही वाढदिवस एकत्रितपणे साजरे करण्यासाठी एका छोटेखानी मात्र गोड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे वनिता जुनघरे, हवालदार संजय बांबोटे आणि सहायक निरीक्षक नितीन पगार या तिघांचेही कुटुंबीय कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्यात एकत्र झाले होते. कार्यक्रमाच्या आयोजनामागची संकल्पना ठाणेदार बागुल यांनी स्पष्ट केली आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा देत तणावमुक्त कार्य करण्याचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)
सुटीही दिली
आजचा दिवस या तीनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत घालवता यावा म्हणून त्यांना सुटी देण्यात आली. या तिघांव्यतिरिक्त अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही या कार्यक्रमाने एक सुखद अनुभूती दिली. दडपण आणि धकाधकीचे जीवन जगणाऱ्या पोलिसांसाठी असे उपक्रम सर्वत्र व्हावेत, अशी भावना अनेक पोलिसांनी व्यक्त केली.