हातावर पाेट असणाऱ्यांना काेराेनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:31+5:302021-04-13T04:08:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वच घटकांना ...

हातावर पाेट असणाऱ्यांना काेराेनाचा फटका
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वच घटकांना फटका बसला असून, शेतमजूर, रोजंदारी मजूर, माथाडी कामगार, लघु उद्योगांवर अवलंबून असणारे कामगार, हमाल या क्षेत्रातील असंघटित वर्गाचे ‘हातावर आणणे आणि पानावर खाणे’ असल्याने कोरोनामुळे अक्षरश: त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यात हजारोंच्या संख्येने शेतमजुरांची संख्या आहे. उन्हाळ्यात शेतातील मजुरीची कामे अत्यंत कमी असतात. अशातच कोरोनामुळे शेती कामावरदेखील परिणाम झाला आहे. शेतकरी आजची कामे उद्यावर ढकलत आहेत. त्यामुळे शिवारामध्ये शुकशुकाट जाणवत असून, शेतमजुरांना काम मिळणे अशक्य झाले आहे. दुसरीकडे, किरकोळ उद्योग व्यावसायिक यात हॉटेल, चहा टपरी, विविध वस्तूंचे किरकोळ विक्रेते, भोजनालय, पंक्चर दुरुस्ती, हेअर सलून, सायकल-मोटारसायकल रिपेरिंग सेंटर, स्पेअरपार्ट विक्रेते, वेगवेगळ्या दुरुस्तीचे कामे करणारे, मोबाईल विक्रेता, चायनीज फूड विक्रेता, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते, फर्निचर, गारमेंट्स, महिला व पुरुषांचे कपडे शिलाई दुकाने, आदी शेकडो प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
लाॅकडाऊनमुळे प्रतिष्ठाने व दुकाने बंद आहेत. त्या दुकानांतील कामगारांना मजुरीच्या रकमेपासून मुकावे लागत आहे. दुकान बंद असल्याने कामगारांना पगार द्यायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.