नागपुरातील शासकीय बालगृहातील मुलांना केअरटेकरकडून अमानुष मारहाण

By योगेश पांडे | Updated: June 6, 2025 23:09 IST2025-06-06T23:09:18+5:302025-06-06T23:09:18+5:30

२ जून रोजी त्यांचे पालक त्यांना घेऊन जाण्यासाठी उपस्थित झाले. नियमानुसार मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.

Caretaker brutally beats children at government children's home in Nagpur | नागपुरातील शासकीय बालगृहातील मुलांना केअरटेकरकडून अमानुष मारहाण

नागपुरातील शासकीय बालगृहातील मुलांना केअरटेकरकडून अमानुष मारहाण

योगेश पांडे 

नागपूर : शासकीय बालगृहात ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना तेथील केअरटेकरसह तीन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या बालकांना इतके मारण्यात आले की त्यांच्या पाठीवर वळदेखील उमटले. मारहाण झालेल्या बालकांना धमकीदेखील देण्यात आली. तीनपैकी दोन आरोपी आऊटसोर्सिंस एजन्सीचे कर्मचारी आहेत. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शासकीय बालगृहातील कनिष्ठ काळजीवाहक राजेंद्र रामाजी वासनिक, तसेच पुणे येथील स्मार्ट सर्व्हिस प्रा.लि. या कंपनीचे इंजमामअली शहाअली सय्यद, सोहेल राज पठाण अशी आरोपींची नावे आहेत. पाटणकर चौकात शासकीय मुलांचे बालगृह आहे. धनंजय करंबे यांच्याकडे तेथील अतिरिक्त प्रभार आहे. ज्या मुलांना संरक्षणाची आवश्यकता आहे तसेच पोलिसांना सापडलेली बालके तेथे ठेवण्यात येतात. त्यांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक नियुक्त करण्यात आले आहेत. ३० मे रोजी सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने १४ ते १६ वयोगटातील सहा मुलांना कायदेशीर प्रक्रिया करून बालगृहात दाखल केले.

२ जून रोजी त्यांचे पालक त्यांना घेऊन जाण्यासाठी उपस्थित झाले. नियमानुसार मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी दोन मुलांनी त्यांना तीनही आरोपींनी बेदम मारहाण केल्याची माहिती दिली. आरोपींनी त्यांना पोलिसांत खोटा गुन्हा दाखल करण्याचीदेखील धमकी दिली. एका मुलाच्या उजव्या मांडीवर तसेच एकाच्या पाठीवर मारल्याचे वळ होते. आरोपींनी त्यांना काठीने मारले होते. ही बाब समोर आल्यावर समितीने बालगृहातील अधिकाऱ्यांना पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार करंबे यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांनी इतरही मुलांना मारहाण केली होती का याचा तपास सुरू आहे.

Web Title: Caretaker brutally beats children at government children's home in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.