नक्षलग्रस्त आदिवासींची शासनाला काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2015 03:19 IST2015-12-16T03:19:23+5:302015-12-16T03:19:23+5:30
नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आदिवासी भागातील निष्पाप नागरिकांची सरकारला काळजी असून त्यादृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.

नक्षलग्रस्त आदिवासींची शासनाला काळजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार देवेंद्र गावंडे यांना प्रदान
नागपूर : नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आदिवासी भागातील निष्पाप नागरिकांची सरकारला काळजी असून त्यादृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्याने जाहीर घोषणा करणे योग्य नाही. पण यासंदर्भात सरकार योग्य निर्णय घेईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दलितमित्र, स्वातंत्र्य सैनिक चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, अॅड. प्रभाकर मारपकवार प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नक्षली अत्याचार कमी झाले असले तरी वेगवेगळ्या स्वरूपात समाजाला त्याची झळ बसते आहे. आपले पोलीस त्यांच्याशी लढतात पण यात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. याबाबत शासन नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेईल, असे ते म्हणाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, विदर्भात नक्षली कारवायांमुळे विकास खुंटला आहे. लोकशाहीत विकास होणे अपेक्षित आहे. विदर्भाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न होत असताना नक्षलवादविरोधातही काम करणे आवश्यक आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे काम महत्त्वाचे आहे. सत्काराला उत्तर देताना गावंडे म्हणाले, या पुरस्कारापोटी मला मिळालेल्या २५ हजाराच्या निधीत माझ्याजवळचे २५ हजार जमा करून एका नक्षलग्रस्त कुटुंबाला ही मदत मी देणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव तर आभार प्रदीप मैत्र यांनी मानले. कार्यक्रमाला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नक्षल समर्थक संघटनांचा धोका
नक्षलवाद्यांच्या कारवाया आणि अत्याचाराच्या घटना कमी झाल्या असल्या नक्षलवादाचा वेगळा चेहरा आता समोर येत आहे. नक्षल समर्थक संघटनांच्या माध्यमातून लोकांचे विचार कलुषित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतो आहे. विचार कलुषित केल्याने व्यवस्थेविरुद्ध आणि शासनाविरुद्ध समाजमन करण्याचे प्रयत्न चालविले जात आहे. वैचारिक गोंधळ वाढविण्याचा प्रयत्न या संघटना करीत असल्याने हे एक छुपे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. व्यवस्थेच्या विरोधात जाणे चूक नाही पण त्याचा विरोधही लोकशाही मार्गाने व्हायला हवा. या विरोधाचे स्वरूप हिंसक होते त्यावेळी चिंता करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या समृद्ध लोकशाहीचा सन्मान ठेवून विरोध लोकशाही मार्गाने करायला हवा. अशा संघटनांपासून सावध राहून जनतेचे विचार दिग्भ्रमित होण्यापासून वाचविण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.