कारचालकाने चिमुकल्याला चिरडले
By Admin | Updated: January 8, 2017 01:59 IST2017-01-08T01:59:32+5:302017-01-08T01:59:32+5:30
वाहन चालविता येत नसतानादेखिल वेगात कार चालवून एका कारचालकाने चार वर्षाच्या बालकाला चिरडले. दक्ष गणेश टेकाडे असे मृत बालकाचे नाव आहे

कारचालकाने चिमुकल्याला चिरडले
बहीण अन् वडीलही गंभीर : मानकापुरात भीषण अपघात
नागपूर : वाहन चालविता येत नसतानादेखिल वेगात कार चालवून एका कारचालकाने चार वर्षाच्या बालकाला चिरडले. दक्ष गणेश टेकाडे असे मृत बालकाचे नाव आहे. गोधनी रोड झिंगाबाई टाकळी परिसरात शनिवारी सकाळी घडलेल्या या भीषण अपघातात दक्षची सहा वर्षीय बहीण पूर्वा आणि वडील गणेश टेकाडे गंभीर जखमी झाले.
झिंगाबाई टाकळी परिसरात फूल विक्रीचा व्यवसाय करणारे गणेश टेकाडे आज सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांच्या दुचाकीने झिंगाबाई टाकळी परिसरातील शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी जात होते. दक्ष नर्सरीत तर पूर्वा केजी २ ला शिकत होती, असे समजते. अण्णाबाबानगरकडे जाणाऱ्या मार्गावरील एमबी टाऊन क्रमांक तीन समोर भरधाव कारने (एमएच ३१/ ईओ ९६६७) मोटरसायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे टेकाडे बापलेक दुचाकीसहीत बरेच अंतर रस्त्याने घासत गेले. गंभीर जखमी झालेल्या टेकाडे बापलेकांना परिसरातील नागरिकांनी डॉक्टरकडे नेले. तेथे डॉक्टरांनी चिमुकल्या दक्षला मृत घोषित केले. गणेश आणि पूर्वा या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातामुळे घटनास्थळी काही वेळ प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच मानकापूर पोलीस घटनास्थळी धावले तर, आरोपी कारचालक चेतन शेषराव चौधरी (वय २२) पळून गेला.
प्रशिक्षण नाही, परवानाही नाही
आरोपी चौधरी याला वाहन चालविता येत नसून त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानादेखिल नसल्याचे पोलीस सांगतात. तरीसुद्धा तो रहिवासी भागातून वेगात कार चालवित होता. त्याच्या बाजूला सुरेश राऊत नामक साथीदार बसून होता, असे समजते. त्याच्या अविवेकीपणामुळे हसत्याखेळत्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे दक्षची आई आणि अन्य नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपी कारचालकाला अटक झालेली नव्हती.