सरकारी पैशाची उधळपट्टी अधिकारी चालवितात कॅन्टिन

By Admin | Updated: April 27, 2016 03:10 IST2016-04-27T03:10:04+5:302016-04-27T03:10:04+5:30

केंद्र व राज्याच्या सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांअभावी कामे रखडत असल्याची नेहमीची बोंब आहे.

Cantin runs a government fund extortion officer | सरकारी पैशाची उधळपट्टी अधिकारी चालवितात कॅन्टिन

सरकारी पैशाची उधळपट्टी अधिकारी चालवितात कॅन्टिन

महालेखाकार कार्यालयात अजब प्रकार : माहिती अधिकारात बाब उघड
नागपूर : केंद्र व राज्याच्या सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांअभावी कामे रखडत असल्याची नेहमीची बोंब आहे. पण सिव्हिल लाईन्स येथील महालेखाकार (लेखा व हकदारी) कार्यालयात अधिकारी व कर्मचारी एवढे अतिरिक्त आहेत की त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागाच्या कॅन्टिनच्या कामात जुंपले आहे. महिन्याला ४१ रुपयांचा तोटा होणाऱ्या कॅन्टिनमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर सरकार महिन्याकाठी ३ लाख २८ हजार ५५८ रुपयांचा खर्च करीत असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

कॅन्टिनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना ३.२८ लाख पगार
कॅन्टिनमध्ये कार्यरत आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च सरकारी तिजोरीतून केला जातो. फेब्रुवारी महिन्यात त्यांना ३ लाख २८ हजार ५५८ रुपये वेतन देण्यात आले. त्या तुलनेत कॅन्टिनला ४१ रुपयांचा तोटा झाला. कार्यालयात वरिष्ठ अकाऊटंट पदावर कार्यरत असलेल्या एन.सी. मरियन यांच्याकडे कॅन्टिन व्यवस्थापकाची जबाबदारी असून दुसरे वरिष्ठ अकाऊटंट बी.एस. हेडाऊ हे कॅन्टिनचा लेखाजोखा सांभाळतात. एच.व्ही. भगत हे हलवाई आहेत. डी.एल. धावने हे सहायक हलवाई असून एस.सी. कांबळे हे चहा बनवितात. अन्य कर्मचारी आर.जे. मसराज आणि ओ.एम. ढाकुलकर हे बेरर म्हणून काम पाहतात. कार्यालयात अकाऊटंट पदावर कार्यरत एस.एच. नगरारे हे कॅश काऊंटरची जबाबदारी सांभाळतात. कदाचित शिक्षा म्हणून त्यांना कॅन्टिनमध्ये नियुक्त केल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्टिनचे कामकाज अधिकारी व कर्मचारी सांभाळीत आहे. आतापर्यंत झालेल्या कोट्यवधींच्या सरकारी खर्चाची भरपाई कोण करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

बाहेरील हलवाई करू शकतात कॅन्टिनचे संचालन
महालेखाकार कार्यालयातील हॉलमध्ये कॅन्टिनचे संचालन करण्यात येते. हॉलचे भाडे घेण्यात येत नाही, शिवाय वीज, पाणी, फर्निचर, दुरुस्ती, भांडे आणि पोषाख शासकीय निधीतून पुरविला जातो. त्यानंतरही फेब्रुवारीमध्ये कॅन्टिनला ४१ रुपयांचा तोटा झाला आहे. हे कॅन्टिन बाहेरील हलवाई कंत्राटीवर नफ्यात चालवू शकतो. त्यामुळे सरकारचा त्यांच्या वेतनावर होणारा खर्च वाचेल आणि कर्मचाऱ्यांची टंचाई न जाणवता सरकारी कामकाज वेळेत पूर्ण होऊ शकते.

कॅन्टिनमध्ये विक्री १.९३ लाख!
सरकारी अधिकारी व कर्मचारी कॅन्टिन चालवित असेल तर त्यांचे वेतन कॅन्टिनचे संचालन करताना होणाऱ्या नफ्यातून निघाले पाहिजे. त्यांच्या पगाराच्या तुलनेत विक्री केवळ १ लाख ९३ हजार ३६० रुपयांची आहे. अशात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात आहे.

Web Title: Cantin runs a government fund extortion officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.