मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठाला कानपिचक्या
By Admin | Updated: February 21, 2015 14:49 IST2015-02-21T14:49:10+5:302015-02-21T14:49:10+5:30
१0१ वा दीक्षांत समारंभ : निकाल वेळेत व अचूक लागावे, 'सोशल मीडिया'चा उपयोग व्हावा

मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठाला कानपिचक्या
■ येथे येण्याअगोदर मी विद्यापीठाचे 'सोशल मीडिया'वर कुठले 'अकाऊंट' आहे का याचा शोध घेतला. एक 'अकाऊंट' सापडले, पण त्यात २0११ पासून कुठलीही हालचाल झालेली नाही. 'सोशल मीडिया' हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक, त्यातील बदल, सूचना इत्यादी बाबी या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. त्यामुळे 'सोशल मीडिया'चा वापर करण्याबाबत विद्यापीठाने विचार करावा, असेदेखील ते म्हणाले.
नागपूर विद्यापीठाला मिळावा केंद्रीय दर्जा
■ राज्यात एकही केंद्रीय विद्यापीठ नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आह. जर तसा पुढाकार घेण्यात आला तर शासनाकडून त्याला पूर्ण सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर : साधारणत: एखाद्या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ म्हटला की त्याबद्दल प्रमुख अतिथींकडून गोडवे गायले जातात. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाच्या ढिसाळ कार्यपद्धतीबद्दल १0१ व्या दीक्षांत समारंभादरम्यान प्रशासनाला कानपिचक्या दिल्या. परीक्षांचे निकाल वेळेवर व अचूकपणे लागावेत ही विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. प्रशासकीय चौकटीतून बाहेर येऊन जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, असा सल्लादेखील त्यांनी दिला.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या १0१ व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची पूर्ण वेळ उपस्थिती होती. याच विद्यापीठात शिक्षण झाले असल्याने व लोकप्रतिनिधी म्हणून येथील समस्यांची जाण असल्याने मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या त्रुटींवर बरोबर बोट ठेवले. विद्यापीठात सर्वात मोठी समस्या आहे ती मूल्यांकनासंदर्भात. वेळेत मूल्यांकन न होणे, चुकीच्या पद्धतीचे मूल्यांकन तसेच फेरमूल्यांकनाच्या निकालांना होणार उशीर यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यात लवकरात लवकर बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा व या सर्व बाबी 'ई-प्लॅटफॉर्म'वर यायला हव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम आजच्या तारखेत सुरू आहेत. यातील किती अभ्यासक्रम खरोखरच कामाचे आहेत याची विद्यापीठाने तपासणी करायला हवी. अभ्यासक्रमांच्या वास्तविकतेचे मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.