विधानभवनाजवळ विकत होते गांजा : कुख्यात वसीम बब्बरसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:57 IST2020-10-08T23:56:12+5:302020-10-08T23:57:33+5:30
Drug paddlers, Crime News सिव्हिल लाईन्समध्ये विधानभवन आणि वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या कुख्यात वसीम ऊर्फ बब्बर पठाण आणि त्याचा साथीदार सोमलाल विश्वकर्माला एनडीपीएस सेलने रंगेहात पकडले.

विधानभवनाजवळ विकत होते गांजा : कुख्यात वसीम बब्बरसह दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हिल लाईन्समध्ये विधानभवन आणि वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या कुख्यात वसीम ऊर्फ बब्बर पठाण आणि त्याचा साथीदार सोमलाल विश्वकर्माला एनडीपीएस सेलने रंगेहात पकडले.
दोन्ही आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अनेक दिवसानंतर वसीम पोलिसांच्या हाती लागला आहे. वसीम अनेक वर्षांपासून गांजाची तस्करी करीत आहे. सिव्हिल लाईन्समध्ये विधानभवनाजवळ मीठा नीम दरगाह आहे. काहीच अंतरावर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय आहे. दोन्हीमध्ये एक छोटी झोपडपट्टी आहे. आरोपी याच झोपडपट्टीत राहतात. ते मीठा नीम दरगाहच्या समोर उभे राहून गांजाची विक्री करतात. गांजा खरेदी करणाऱ्यांची या परिसरात नेहमीच ये-जा असते. वसीम कुख्यात गुन्हेगार असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. एनडीपीएस सेलचे पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. आज सकाळी त्याने सोमलाल विश्वकर्माच्या मदतीने गांजाची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता अॅक्टिव्हा गाडीत ५० हजार रुपये किमतीचा ३ किलो ३६२ गॅ्रम गांजा आढळला. पोलिसांनी गांजा आणि अॅक्टिव्हा जप्त केली आहे.