परवाना शुल्क वाढीचा अध्यादेश रद्द करा
By Admin | Updated: February 28, 2016 03:01 IST2016-02-28T03:01:07+5:302016-02-28T03:01:07+5:30
महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करून वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ करण्यात आली आहे.

परवाना शुल्क वाढीचा अध्यादेश रद्द करा
प्रकाश गजभिये : आरटीओ अधिकाऱ्यांना घेराव
नागपूर : महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करून वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आॅटो व टॅक्सी चालकांचे कंबरडे मोडणारे आहे. शासनाने हा अध्यादेश रद्द करावा, या मागणीला घेऊन आ. प्रकाश गजभिये यांनी शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास घेराव घातला. दरम्यान कार्यालयासमोर अध्यादेशाची होळीही केली.
पूर्वी आॅटोरिक्षा परवान्याच्या नुतनीकरणाला २०० रुपये शुल्क आकारले जायचे आता नव्या आदेशाप्रमाणे १००० रुपये आकारले जाणार आहे. मासिक दंडाचे १०० रुपये शुल्क असताना ते ५००० रुपये दंड निर्धारीत करण्यात आले आहे. परमिट न घेणाऱ्यांना पूर्वी २०० रुपये शुल्क होते ते आता १० हजार रुपये करण्यात आले आहे. आॅटोचालकांसाठी हे शुल्क अवास्तव आहे. हा अध्यादेश त्वरित रद्द करून आॅटोचालकांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन आ. गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना घेराव घालून दिले. तीन तास चाललेल्या या घेराव्यात आ. गजभिये यांनी लॉटरी पद्धतीने देण्यात येणाऱ्या आॅटो परवान्यासाठी मराठी भाषेच्या सक्तीवरही सडकून टीका केली. यावेळी विजय गजभिये, गोपी आंभोरे, संतोष नरवाडे, रमेश मानकर, हैदर अली शेख, उत्तररावजी मरसकोल्हे, रवी किलनाके, विजय डोरले, मनोज ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)