हनीसिंगचा अटकपूर्व जामीन रद्द करा : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:23 IST2019-12-18T22:22:04+5:302019-12-18T22:23:21+5:30
अटी व शर्तींचे उल्लंघन आणि अन्य विविध प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यामुळे रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा अशा विनंतीचा अर्ज तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे.

हनीसिंगचा अटकपूर्व जामीन रद्द करा : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अटी व शर्तींचे उल्लंघन आणि अन्य विविध प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यामुळे रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा अशा विनंतीचा अर्ज तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. जब्बल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदेशातील शर्तीनुसार हनीसिंग न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. दरम्यान, न्यायालयाने त्याला काहीवेळा देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली. त्याकरिता त्याला रहिवासी पत्ता, संपर्क पत्ता इत्यादी माहिती पोलिसांना द्यायची होती. परंतु, त्याने यासंदर्भात खोटी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. प्रकरणाच्या तपासाकरिता हनीसिंगला पोलिसांसमक्ष हजर करणे आवश्यक आहे असे जब्बल यांचे म्हणणे आहे. जब्बलतर्फे अॅड. रसपालसिंग रेणू कामकाज पाहतील.