कॅनडाच्या बिन्नीमुळे वाचले खारूताईच्या पिलांचे जीव ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:31+5:302021-02-14T04:08:31+5:30
नागपूर : ती मूळची कॅनडाची, बिन्नी तिचे नाव. यावेळी तिची चर्चा हाेत आहे ती तिच्या प्राणी, पक्ष्यांवर दर्शविलेल्या प्रेमामुळे. ...

कॅनडाच्या बिन्नीमुळे वाचले खारूताईच्या पिलांचे जीव ()
नागपूर : ती मूळची कॅनडाची, बिन्नी तिचे नाव. यावेळी तिची चर्चा हाेत आहे ती तिच्या प्राणी, पक्ष्यांवर दर्शविलेल्या प्रेमामुळे. ही तरुणी कुठेतरी जात असताना खारूताइची दाेन पिले तिला जखमी अवस्थेत विव्हळताना दिसली आणि तिलाही गहिवर आला. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता बिन्नीने त्यांना उचलले. कॅब बुक केली आणि गुगलवरून घेतलेल्या शाेधाच्या आधारे त्या पिलांना घेऊन थेट सेमिनरी हिल्सचे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर गाठले. तिच्या तत्परतेने आता ही दाेन्ही पिले सुखरूप आहेत.
आर्किटेक्ट असलेली बिन्नी सध्या एका प्राेजेक्टसाठी नागपूरला वास्तव्यास आहे. मात्र या अल्प काळात पक्षी व प्राणिप्रेमी म्हणून ती चर्चेत आली. झाले असे की, प्रकल्पाच्या कामाने ती सर्वत्र फिरत असते. यापूर्वी कसल्या तरी कारणाने जखमी झालेला कबुतर पाहून ती अस्वस्थ झाली. या धावत्या जगात माणसांच्या वेदना पाहण्यास कुणाजवळ वेळ नसताना बिन्नी मात्र एका पक्ष्यासाठी थांबली. तिने गुगलवर शाेधाशाेध केली, ज्यावर ट्रान्झिटबाबत माहिती मिळाली. ओळख असलेल्या विनीत अराेरा यांना तिने संपर्क साधला. विनीत यांनी ताे कबुतर बिन्नीकडून ट्रान्झिटमध्ये आणला. त्याच्यावर उपचार करून त्याला सुखरूप मुक्त करण्यात आले. आकाशात भरारी घेतानाचा व्हिडिओ बघून बिन्नीला अत्यानंद झाला हाेता. यावेळी तिला अशाच जखमी अवस्थेत खारुताइची पिले आढळली. यावेळी विनीत यांच्या सूचनेनुसार ती स्वत: या पिलांना घेऊन ट्रान्झिट सेंटरमध्ये आली आणि डाॅक्टरांकडे साेपविले. ट्रान्झिटचे डाॅ. सैयद बिलाल यांनी त्या पिलांवर उपचार सुरू केले. यावेळी बिन्नी स्वत: हजर हाेती. तिच्या देशात जखमी प्राण्यांसाठी आधुनिक उपचार सेवा असतीलच पण नागपुरात ट्रान्झिट सेंटरच्या उपचार सेवेने बिन्नीलाही भारावून साेडले.