लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार थांबला. रविवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारासाठी जोर लावला. प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेण्यावर प्रत्येक उमेदवाराने भर दिला. यासोबतच विविध राजकीय पक्षातील नेतेही शेवटच्या दिवशी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले.
पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या १ डिसेंबर रोजी होणार आहे. एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी शेवटच्या दिवस असल्याने प्रत्येक उमेदवारानेच प्रचारात स्वत:ला झोकून दिले. काहींनी पदवीधरांचा मेळावा घेतला. मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांचा जास्त भर राहिला. रविवारचा दिवस असल्याने बहुतांश लोक घरीच होते. त्यामुळे उमेदवारांसाठी शेवटचा दिवस अधिक चांगला राहिला.
यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा मतदारांना आवाहन करण्यात आले.