जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अभियान
By Admin | Updated: July 7, 2015 02:32 IST2015-07-07T02:32:22+5:302015-07-07T02:32:22+5:30
जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शिवाय या कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा,

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अभियान
पीआयएमसी समिती स्थापन : राज्यभर प्रचार-प्रसार
नागपूर : जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शिवाय या कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने सभा व कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, या अभियानाचा एक भाग म्हणून अलीकडेच पूर्व विदर्भ विभागाची ५ जुलै रोजी विनोबा विचार केंद्र येथे कार्यशाळा घेण्यात आली. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीची धुरा असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी ३ जुलै रोजी सिव्हिल लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे प्रशिक्षण घेण्यात आले. या कार्यक्रमाला नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांसह वर्धा जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना कायद्यातील सर्व बारकावे पटवून देण्यात आले. तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कायद्याच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आल्याचे मानव यांनी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यात प्रशिक्षित वक्त्यांच्या माध्यमातून राज्यभरातील ३५७ शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करू न हा कायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे प्रा. मानव यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे व राज्य सचिव प्रशांत सपाटे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)