घाण करणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर
By Admin | Updated: January 8, 2017 02:22 IST2017-01-08T02:22:31+5:302017-01-08T02:22:31+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.

घाण करणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर
स्वच्छता अभियान : सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर होणार कारवाई
नागपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत चांगले काम केल्याने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही मिळालेले आहेत. परंतु महापालिके ची कार्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि शौचालयाच्या भिंती पान व खर्रा खाणाऱ्यांच्या थुंकीमुळे रंगलेल्या आहेत. परंतु आता शहरात बसविण्यात येणाऱ्या चार हजार आयपी कॅमेऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना आळा बसणार आहे.
महापालिकेच्या झोन कार्यालयातील इमारती, शौचालयांच्या भिंती थुंकीमुळे विद्रूप झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यालयातील जुन्या इमारतींमधील शौचालये व भिंतींची अशीच अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमधील शौचालयात खर्रा खाणाऱ्यांच्या थुंकीमुळे घाण साचलेली आहे. जुन्या इमारतीतही अशीच अवस्था आहे. बाजूलाच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. परंतु याकडे विभागाचे दुर्लक्ष आहे.
महापालिका मुख्यालयात महापौर व आयुक्तांसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत परंतु स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील हिरवळीच्या आजूबाजूला कचरा व घाण नजरेस पडते. महापौरांच्या कक्षासमोरील भाग, निगम सचिवांच्या कार्यालयासमोरचा भाग व सत्तापक्ष नेत्यांच्या कार्यालया समोरील भागात तसेच वरच्या माळ्यावर जाण्याच्या पायऱ्यांवर जागोजागी थुंकीने भिंती व कोपरे विद्रूप झाल्याचे दिसून येते. नवीन इमारतीच्या पायऱ्या ठिकठिकाणी थुंकल्यामुळे विद्रूप झालेल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या बाजूला दिव्यांगासाठी शौचालयाची सुविधा आहे. परंतु शौचालयात घाण पसरलेली आहे. शहरातील शासकीय कार्यालयातही अशीच परिस्थिती आहे. शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलाखाली ठिकठिकाणी घाण साचलेली आहे. खर्रा व पानांच्या थुंकीमुळे पुलाखालील परिसर विद्रूप केलेला आहे. परंतु आता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात चार हजार आयपी कॅमेरे लागणार आहेत.
यामुळे वाहतूक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांसोबतच सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना या कॅमेऱ्यात टिपले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण व विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.(प्रतिनिधी)