कारागृहात लागले कॉईन बॉक्स टेलिफोन

By Admin | Updated: December 6, 2014 02:44 IST2014-12-06T02:44:53+5:302014-12-06T02:44:53+5:30

कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी बोलता यावे यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात वायरलेस कॉईन बॉक्स टेलिफोन लावण्यात आले आहेत.

Cain box telephone in prison | कारागृहात लागले कॉईन बॉक्स टेलिफोन

कारागृहात लागले कॉईन बॉक्स टेलिफोन

नागपूर : कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी बोलता यावे यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात वायरलेस कॉईन बॉक्स टेलिफोन लावण्यात आले आहेत. राज्य शासनाने हायकोर्टात ही माहिती सादर केली.
कारागृहात कॉईन बॉक्स टेलिफोन लावण्यासाठी अश्रत शफिक अंसारीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. उद्देश पूर्ण झाल्यामुळे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी ही याचिका निकाली काढली आहे. यापूर्वी अन्य एका प्रकरणात राज्य शासनाने कारागृहात कॉईन बॉक्स टेलिफोन लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. हा निर्णय अनेक महिन्यांपर्यंत अंमलात आला नाही. यामुळे अंसारीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अंसारी २००२ मध्ये गेट वे आॅफ इंडिया येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. ठाणे, नवी मुंबई, येरवडा, तिहार व चेरापल्ली कारागृहात कॉईन बॉक्स टेलिफोन लावण्यात आले आहेत. तिहार कारागृहातील कैदी रोज पाच मिनिटे कुटुंबीयांसोबत बोलू शकतो. कॉईन बॉक्स टेलिफोन लावण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक कैद्यांचे नातेवाईक दुसऱ्या राज्यात राहतात. त्यांना दुरून यावे लागते. नातेवाईक लांब राहात असल्यामुळे अनेक कैद्यांना कोणीच भेटायला येत नाही. कॉईन बॉक्स टेलिफोन लावल्यास ही समस्या दूर होईल. टेलिफोनवरून बोलताना कैद्यांवर सीसीटीव्ही कॅमेरा किंवा कारागृह कर्मचाऱ्यामार्फत लक्ष ठेवता येऊ शकते, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली, तर शासनातर्फे एपीपी मेहरोज खान पठाण यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Cain box telephone in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.