दुकाने बंद करताना उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:13+5:302021-04-07T04:09:13+5:30
उमरेड : राज्य शासनाच्या जमावबंदी तसेच संचारबंदीचा आदेश रात्री उशिराने धडकल्यानंतर मंगळवारी सकाळी ११.३० वाजेपासून दुकाने बंद करण्यासाठी तालुका ...

दुकाने बंद करताना उडाली तारांबळ
उमरेड : राज्य शासनाच्या जमावबंदी तसेच संचारबंदीचा आदेश रात्री उशिराने धडकल्यानंतर मंगळवारी सकाळी ११.३० वाजेपासून दुकाने बंद करण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रमोद कदम, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे आणि नगरपालिकेच्या संयुक्त चमूने दुकाने बंद करण्यासाठी पाऊल उचलले. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेली दुकाने अचानक, तातडीने बंद करताना दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली.
जमावबंदीची घोषणा करण्यात आली असून, पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. शिवाय, अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरता येणार नाही. सार्वजनिक उद्याने, मैदाने आदी रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. सर्व दुकाने, बाजारपेठ, मॉल, व्यायामशाळा, जिम, सिनेमागृह ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. किराणा, बेकरी, भाजीपाला, फळाची दुकाने, दूध डेअरी आदी आवश्यक दुकाने सुरू ठेवता येतील; मात्र दुकानात काम करणाऱ्या सर्वांनी लसीकरण पूर्ण करावे. लसीकरण होईस्तोवर आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी सोबत बाळगणे अनिवार्य राहील, अन्यथा नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून स्थानिक नगरपालिका प्रशासनाने आदेश जारी केले आहेत.
....
स्वागत, आश्चर्य व टीका
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने हे कडक पाऊल उचलणे गरजेचे होते, अशा शब्दात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दुसरीकडे, अनेकांनी अचानक तडकाफडकी बंदच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. सर्वांचीच दुकाने-प्रतिष्ठाने सुरू ठेवत यामध्ये वेळेचा कालावधी कमी करून नियोजन आखायला हवे होते, अशीही बाब व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. अनेकांनी शासनाच्या या निर्णयावर टीका केली आहे.