CA अनुप सगदेव यांना अटकपूर्व जामीन नाहीच; चार कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 1, 2024 18:43 IST2024-02-01T18:43:47+5:302024-02-01T18:43:51+5:30

सगदेव यांनी सुरुवातीस सत्र न्यायालयाला अटकपूर्व जामीन मागितला होता. ती विनंती नामंजूर झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

CA Anup Sagadev not granted anticipatory bail; Allegation of embezzlement of Rs.4 crores | CA अनुप सगदेव यांना अटकपूर्व जामीन नाहीच; चार कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप

CA अनुप सगदेव यांना अटकपूर्व जामीन नाहीच; चार कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप

नागपूर : चार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेले सीए अनुप चारुदत्त सगदेव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.

सगदेव यांनी सुरुवातीस सत्र न्यायालयाला अटकपूर्व जामीन मागितला होता. ती विनंती नामंजूर झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना येथेही दिलासा मिळाला नाही. फिर्यादी किशोर वाघमारे (७१) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी सगदेव यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६ व ४२० अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. वाघमारे अंकुर लॉजिस्टिक नावाने कंपनी संचालित करीत होते. या कंपनीचा लेखा व्यवहार सांभाळण्यासाठी अनुप सगदेव यांचे वडील चारुदत्त सगदेव यांच्या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, वाघमारे यांनी २००० मध्ये अंकुर लॉजिस्टिक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, पण अनुप सगदेव यांनी त्यांना कंपनी बंद करू दिली नाही. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०१७ रोजी वाघमारे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली. त्यामधून त्यांना सगदेव यांनी या कंपनीद्वारे ३ कोटी ९९ लाख ९० हजार रुपयांचा बेकायदेशीर व्यवहार केल्याची माहिती मिळाली. सगदेव यांनी यासंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण सादर केले नाही. परिणामी, वाघमारे यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. नितीन रोडे यांनी बाजू मांडली.

Web Title: CA Anup Sagadev not granted anticipatory bail; Allegation of embezzlement of Rs.4 crores