नागपूर : एकीकडे सत्ताधारी भाजपमधील काही नेते सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याची संधी शोधत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र उद्योजकांच्या मंचावरून महात्मा गांधी व नेहरूंचे विचार मांडले. गांधी व नेहरूंच्या दोन गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनाची आवश्यकता आहे, असे नेहरू म्हणायचे. तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून उत्पादन वाढविले पाहिजे, असे गांधीजींचे विचार होते. आमचेदेखील सर्वात जास्त प्राधान्य रोजगार निर्मितीवरच आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपुरात भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नवीन विदर्भ विभागीय कार्यालयाचे गडकरींच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
विदर्भात रोजगार निर्मिती करूनच येथील गरीबी दूर होऊ शकेल. सुखी-समृद्धी विदर्भ हा कृषी व उद्योग क्षेत्राच्या विकासातूनच साकारू शकतो. विदर्भातील लोकांच्या आशा आकांक्षा विकासाशी जुळल्या आहेत. विदर्भ समृद्ध झाला तर महाराष्ट्र व पर्यायाने देश समृद्ध होईल. सीआयआयसारख्या उद्योजकांच्या संस्थांनी या दिशेने काम केले पाहिजे, गडकरी म्हणाले.
कुठल्याही उद्योगाच्या विकासासाठी पाणी ,ऊर्जा ,वाहतूक आणि संचार या गोष्टी महत्त्वाच्या असून विदर्भातील खनिज, कोळसा, वनउत्पादन पर्यटन कापूस उद्योग या सर्व उद्योगवाढीच्या संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीच्या विदर्भात होत असलेल्या विभागीय कार्यालयाने अभ्यास करून या क्षेत्रातील कमकुवत दुवे ओळखावे आणि त्यांना बलस्थानामध्ये रूपांतरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.