Buying a car online is expensive | नागपुरात ऑनलाइन कार खरेदीचा सौदा महागात पडला

नागपुरात ऑनलाइन कार खरेदीचा सौदा महागात पडला


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाइन कार विक्रीची जाहिरात पाहून ती खरेदी करण्याचा सौदा करणे एका तरुणाला महागात पडले. आरोपीने पीडित तरुणाकडून २९ हजार रुपये घेतले. मात्र, त्याला कार दिलीच नाही. ९ डिसेंबर २०१९ ला घडलेल्या या गुन्ह्याची सायबर शाखेतून चौकशी झाल्यानंतर सोमवारी नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुण ३० वर्षांचा असून तो नंदनवन मध्ये राहतो. खाजगी काम करणाऱ्या या तरुणाने डिसेंबर २०१९ मध्ये कार विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो वेगवेगळ्या ऑनलाइन साईटवर कार बघू लागला. त्याला एमएच ३१/ एफए ६०९७ क्रमांकाच्या मारुती ऑल्टोची जाहिरात दिसली. नमूद जाहिरातीतील मोबाईलवर पीडित तरुणाने संपर्क साधला. त्यानंतर १ लाख, ४० हजार रुपयात या कारचा सौदा पक्का केला. २९,१४९ रुपये टोकन अमाऊंट दिल्यानंतर कारची डिलिव्हरी देण्याचे ठरले. त्यानुसार पिडीत तरुणाने ९ डिसेंबर २०१९ ला पेटीएमच्या माध्यमातून रक्कम आरोपीच्या खात्यात जमा केली. ती काढून घेतल्यानंतर आरोपीने आणखी रक्कम मागितली.

त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून कारची डिलिव्हरी न देता पीडित तरुणाची फसवणूक केली. पिडीत तरुणाने नंदनवन पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार अर्ज दिला. तो सायबर शाखेत तपासासाठी पाठविण्यात आला. तब्बल सात महिने चौकशी झाल्यानंतर सायबर शाखेने या प्रकरणात सोमवारी गुन्हा दाखल करण्याची नंदनवन पोलिसांना सूचना केली. त्यानुसार कलम ४२० तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या सहकलम ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत

 

Web Title: Buying a car online is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.