व्यावसायिकास मारहाण करून लुटले
By Admin | Updated: April 28, 2016 03:02 IST2016-04-28T03:02:26+5:302016-04-28T03:02:26+5:30
लग्नसमारंभ आटोपून पारशिवनीला मोटरसायकलने येत असलेल्या व्यावसायिकाला पाच तरुणांनी वाटेत अडविले.

व्यावसायिकास मारहाण करून लुटले
साहित्य हिसकावले : पालोरा शिवारातील घटना
पारशिवनी : लग्नसमारंभ आटोपून पारशिवनीला मोटरसायकलने येत असलेल्या व्यावसायिकाला पाच तरुणांनी वाटेत अडविले. त्यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५३ हजार १५० रुपये किमतचा मुद्देमाल हिसकावून त्यांनी पळ काढला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दतील नयाकुंड-पालोरा शिवारात शुक्रवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.
उत्तम वडस्कर रा. पारशिवनी, असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. वडस्कर हे लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी चिचभुवन येथे गेले होते. लग्न आटोपल्यानंतर ते त्यांच्या दुकानात नोकरी करणाऱ्या सचिन कडू नामक तरुणासोबत मोटरसायकलने पारशिवनी यायला निघाले. दरम्यान, नयाकुंड ते पालोरा दरम्यानच्या पेंच नदीचा पूल ओलांडताच त्याच्या मागून मोटरसायकलने आलेल्या चार ते पाच तरुणांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला. परिणामी, दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते खाली कोसळले.
त्यातच या तरुणांनी त्यांच्याजवळील ५० हजार रुपये किमतीची मोटरसायकल, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल हॅण्डसेट व १५० रुपये रोख असा एकूण ५३ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. त्यांच्यावर पारशिवनी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा हल्ला सुनियोजित असल्याचा आरोप वडस्कर यांनी केला असून, आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)