बोगस आयडीद्वारे कोट्यवधींचा व्यापार
By Admin | Updated: July 16, 2015 03:15 IST2015-07-16T03:15:44+5:302015-07-16T03:15:44+5:30
मनीलाँड्रिंग आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे तार पूर्व नागपुरातील एका तरुण डबाबंद व्यापाऱ्याशी जुळलेले आहेत.

बोगस आयडीद्वारे कोट्यवधींचा व्यापार
मनीलाँड्रिंग-स्पॉट फिक्सिंगशी तार : पोलिसांची दिशाभूल करीत रोवले पाय
नागपूर : मनीलाँड्रिंग आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे तार पूर्व नागपुरातील एका तरुण डबाबंद व्यापाऱ्याशी जुळलेले आहेत. बोगस ‘आयडी’च्या माध्यमातून दररोज कोट्यवधींचे वारेन्यारे करणाऱ्या या डबाबंद व्यापाऱ्याचे जाळे विदेशापर्यंत पसरलेले आहे. एक पुढारी आणि आयपीएस अधिकाऱ्यासोबत संबंधित या व्यापऱ्याची प्रगती पाहून कुणीही आश्चर्यचकित होईल. तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतरही या व्यापाऱ्याला पोलिसांचा आश्रय मिळालेला आहे.
सक्तवसुली संचालनालया(ईडी) ने सोमवारी मनीलाँड्रिंग आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या संबंधात नागपूरच्या क्रिकेट सट्टेबाजाच्या रामदासपेठ येथील फ्लॅटवर धाड टाकली होती. ईडीच्या अहमदाबाद येथील शाखेने दिल्ली व वडोदरा येथे पकडण्यात आलेले क्रिकेट सट्टेबाज हे आंतरराष्ट्रीय हवाला टोळीशी संबंधित असल्याचा खुलासा केला होता. चार हजार कोटी रुपयांचा हवाला व्यापार ईडीच्या हाती लागला होता. ईडीने प्रिव्हेन्शन आॅफ मनीलाँड्रिंग अॅक्ट(पीएमएलए)अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. लोकमतने दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणाचे तार नागपूरशी जुळले असल्याचा खुलासा केला होता, हे विशेष. मंगळवारी ईडीने नागपूरसह देशातील अनेक शहरांमध्ये धाड टाकली. नागपुरात संजय ऊर्फ छोटू अग्रवालच्या रामदासपेठ येथील फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. छोटू स्पॉट फिक्सिंगचाही आरोपी आहे.
सूत्रानुसार या प्रकरणात पूर्व नागपुरातील एका डबाबंद व्यापाऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. हा व्यापारी काही वर्षांपूर्वी सामान्य व्यापारी होता. मागील ८-१० वर्षांत त्याने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. हा व्यापारी बोगस आयडीच्या माध्यमातून व्यापार करतो. त्याच्याजवळ १०० पेक्षा अधिक बोगस आयडी असल्याचे सांगितले जाते. त्याचा संपूर्ण व्यापार विदेशात असलेल्या एका ‘सर्व्हर’च्या माध्यमातून संचालित केला जातो. भारतीय तपास यंत्रणेच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी त्याने ही पद्धत अवलंबिली आहे. याच पद्धतीने आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगशी जुळलेले आरोपी काम करतात. गुप्तचर संस्थेच्या हाती लागल्याने ते सापडले.
बोगस आयडीच्या माध्यमातून दररोज कोट्यवधी रुपयांचा डबाबंद व्यापार केला जातो. ‘डबाबंद व्यापार’ हे सट्ट्याचेच दुसरे रूप आहे. त्यामुळेच डबाबंद व्यापाऱ्यांनी सट्टेबाजांच्या मदतीने साखळी तयार केली आहे. दोन महिन्यापूर्वी या व्यापाऱ्याचा भरवशाचा सोबती असलेला ‘गोपी’ याला गिट्टीखदान पोलिसांनी क्रिकेट सट्टा चालविताना अटक केली होती. पोलिसांनी गोपीसह नऊ आरोपींना पकडले होते. या साखळीच्या माध्यमातून डबाबंद व्यापारी सट्टेबाजी आणि हवाला व्यापार वाढविण्यास मदत करीत आहेत. या कामात त्याला ‘रौनक’ ची खूप मदत मिळते. या व्यापाऱ्याचे पूर्व नागपुरात कार्यालय आहे. तेथून दरदिवशी कोट्यवधी रुपयांची लेन-देन केली जाते. हवाला व्यापारी लखोटिया बंधूंच्या खुनानंतर पूर्व नागपुरातील नागरिकांनी हवाला कार्यालयांना हटविण्याची मागणी केली होती. त्याच धर्तीवर डबाबंद व्यापाऱ्याचे कार्यालय हटविण्याचीसुद्धा मागणी होऊ लागली आहे. काही लोकांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली या व्यापाऱ्याला लकडगंज पोलिसांनी अटकही केली होती. यानंतर काही दिवस शांत राहिल्यानंतर तो पुन्हा नवीन शक्तीसह उभा झाला आहे. सध्या त्याचा व्यापार विदेशापर्यंत पोहोचला आहे.
सूत्रानुसार डबाबंद व्यापाऱ्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांशीही संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून त्याने काही आयपीएस अधिकाऱ्यांनाही आपल्यात सामील करून घेतले आहे. या अधिकाऱ्यांच्या मदतीने तो अनेकदा तपास संस्थांपासून सुरक्षित वाचून निघाला आहे. त्यामुळे या व्यापाऱ्याची पूर्ण माहिती कधीच समोर येऊ शकली नाही. मनीलाँड्रिंगच्या ताज्या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यामुळे सत्य बाहेर येऊ शकते. दरम्यान, मंगळवारी पडलेल्या धाडीत कुठलेही मोठे यश हाती आले नसल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ईडीच्या अधिकाऱ्यांची एक चमू छोटू अग्रवालच्या घरातील दस्तऐवजांची तपासणी करीत होती.(प्रतिनिधी)
त्या आयपीएसचे पितळ उघडे पडणार
या डबाबंद व्यापाऱ्याने शहर पोलिसांना लाखो रुपयांचे साहित्य फुकटात वाटले आहे. या भेटीची तो किमतही वसूल करीत आहे. शहरातील ठाणे आणि चौकांमध्ये या व्यापाऱ्याची आणि पोलिसांचे संयुक्त लोगोसुद्धा पाहता येऊ शकतात. या सर्व गोष्टींचा प्रचार तो सोशल मीडियाच्या माध्यमाने करून पोलिसांत आपली चांगली ओळख असल्याचा दावा तो करीत असतो. त्याने शहरातील काही ठाण्यांचे सौंदर्यीकरणही केले आहे. या दिशेने तपास केल्यास काही आयपीएस अधिकाऱ्यांचेही पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.
अफवा पसरविण्यात माहीर
सूत्रानुसार डबाबंद व्यापारी दोन दिवसांपासून या प्रकारच्या कारवाईची चर्चा पसरवीत आहे. त्यामुळे बहुतांश संदिग्ध व्यापारी अगोदरच भूमिगत झाले आहेत. त्याने बुधवारी सकाळीसुद्धा आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर ईडी आणि आयकर विभागातर्फे धाड टाकण्यात आल्याची अफवा पसरविली. याचप्रकारे अफवा पसरवून त्याने अनेकदा पोलीस आणि तपास संस्थांची दिशाभूल केली आहे.