बससेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत
By Admin | Updated: March 3, 2017 02:55 IST2017-03-03T02:55:20+5:302017-03-03T02:55:20+5:30
महापालिकेने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड(व्हीएनआयएल) यांची सेवा खंडित करून ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत

बससेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत
विद्यार्थी व प्रवासी त्रस्त : २३७ पैकी १६० बसेस रस्त्यांवर
नागपूर : महापालिकेने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड(व्हीएनआयएल) यांची सेवा खंडित करून ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत १ मार्चपासून शहरातील बससेवा सुरू केली आहे. परंतु सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी शहरातील बस वाहतूक विस्कळीत होती. परीक्षा सुरू असतानाच शहरातील बसफेऱ्या कमी झाल्याने याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.
व्हीएनआयएलची सेवा खंडित केल्यानंतर नवीन तीन आॅपरटरने शहरातील वाहतुकीची जबाबदारी स्वीकारली आहे. जुन्या आॅपरेटरची सेवा खंडित केल्याचा शहरातील वाहतुकीवर फारसा परिणाम होणार नाही. पहिल्या दिवशी १८० बसेस धावतील असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु २३७ बसेसपैकी पहिल्या दिवशी १३५ बसेस शहरातील रस्त्यांवर धावत होत्या तर दुसऱ्या दिवशी ही संख्या १६० पर्यंत पोहचली. मार्गावरील बसेसच्या फेऱ्या कमी झाल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे हाल झाले. शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांना बसची प्रतीक्षा करावी लागली. ज्या मार्गावर स्टार बसशिवाय पर्याय नाही, अशा मार्गावरील प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले.
मोरभवन व महाराजबाग आदी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. पिपळा, हिंगणा, कामठी व पारडी आदी बसस्थानकावर प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागली. आपली बस प्रकल्पांतर्गत चालक व वाहकांची जबाबदारी चौथ्या आॅपरेटरवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी व्हीएनआयएलच्या २०८ वाहकांना सेवेत घेण्यास नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. तर आरोप असलेल्या वाहकांना सेवेत न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)