जिहादी व कम्युनिस्टांना अरबी समुद्रात दफन करा
By Admin | Updated: January 12, 2017 23:07 IST2017-01-12T23:07:34+5:302017-01-12T23:07:34+5:30
गेल्या काही काळापासून देशात जिहादी कारवाया वाढल्या आहेत. सीमेवर शत्रूपासून धोका आहे, तर देशाच्या आत जिहादी शक्ती व हिंदूवर हल्ले करणा-या कम्युनिस्टांचे भय

जिहादी व कम्युनिस्टांना अरबी समुद्रात दफन करा
ऑनलाइ लोकमत
नागपूर, दि. 12 - गेल्या काही काळापासून देशात जिदादी कारवाया वाढल्या आहेत. सीमेवर शत्रूपासून धोका आहे, तर देशाच्या आत जिहादी शक्ती व हिंदूंवर हल्ले करणा-या कम्युनिस्टांचे भय आहे. देशाला भयमुक्त करण्यासाठी जिहादी व कम्युनिस्टांना अरबी समुद्रात दफन करायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे माजी खासदार तरुण विजय यांनी केले आहे. विवेकानंद केंद्र नागपूर शाखेतर्फे आणि सुमतीबाई पां.देव मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ‘विश्वगुरु भारताचे द्रष्टा स्वामी विवेकानंद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विवेकानंद केंद्राचे विदर्भ प्रमुख आनंद बगडिया, नगर संचालक जगदीश हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशाचा भूतकाळ फारच चरित्रवान आणि समृद्ध होता. मात्र आपल्याला त्याचा विसर पडला आहे. देशात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. मात्र त्यांचे कार्य व विचार केवळ संग्रहालये व पुस्तकांपुरते मर्यादित झाले आहेत. स्मृतिहिनता हा आपल्या देशाला लागलेला सर्वात मोठा रोग आहे. इतिहासातील अस्मितेचा विसर पडला आहे. विवेकानंदांनी देशाच्या गौरवशाली स्मृति जागविल्या व हिंदू समाजाला जागृत केले होते. त्यांचे कार्य पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे तरुण विजय म्हणाले.
बहिणीच्या आत्महत्येनंतर स्वामी विवेकानंदांनी समाज जागृतीचा संकल्प केला. समाजातील पाखंड, कुरीतीविरोधात त्यांनी निर्भिडपणे मत मांडले व त्यांचा विरोध केला. त्यामुळेच त्यांना ‘वीर संन्यासी’ असे संबोधण्यात येते. देशात धर्मांतरण, लव्ह जिहाद हे प्रकार वाढीस लागले आहेत. एक हिंदू दुसºया धर्मात गेला म्हणजे केवळ हिंदूंची लोकसंख्या कमी होत नाही, तर धर्मासाठी एक नवा शत्रू निर्माण होतो, असेदेखील त्यांनी सांगितले.
बंगाल का पेटतेय ?
बंगालने रविंद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक तेजस्वी व वीरपुरुषांचा बंगालच्या मातीत जन्म झाला. हिंदू धर्माला तेथून मोठे संस्कार मिळाले. मात्र आज त्याच बंगालमध्ये हिंदू असुरक्षित आहे. सातत्याने हिंदूंवर हल्ले होत आहे. बंगाल का पेटत आहे, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तरुण विजय यांनी केले. जर हिंदूंवर आघात होत असेल तर तेथील शासनकर्ते विवेकानंदांना मानत असल्याचा दावाच करु शकत नाही, या शब्दांत त्यांनी ममता बॅनर्जींचे नाव न घेता टीका केली.