कॉफी मशीनचा स्फोट
By Admin | Updated: December 3, 2015 03:12 IST2015-12-03T03:12:31+5:302015-12-03T03:12:31+5:30
एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने मशीनजवळ असलेल्या एका १० वर्षीय मुलीसह चौघे जखमी झाले.

कॉफी मशीनचा स्फोट
नागपूर : एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने मशीनजवळ असलेल्या एका १० वर्षीय मुलीसह चौघे जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री विद्यापीठ कॅम्पस ते अंबाझरी उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गुरुनानक भवनसमोर घडली.
कॅम्पस ते अंबाझरी दरम्यानच्या रोडवर गुरुनानक भवनसमोर मराठा सावजी नावाचे लॉन आहे. येथे बुधवारी सायंकाळी यादव आणि घाटे कुटुंबीयांमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न समारंभातील आनंददायी वातावरणात सर्वच आपापल्या कामात व्यस्त होते. कुणी भोजन करीत होते तर कुणी कुटुंबीयांसोबत चर्चेत मग्न होते. दरम्यान रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास अचानक कॉफी मशीनचा स्फोट झाला. यावेळी कॉफी मशीनजवळ उभी असलेल्या श्रावणी तारेकर (१०), मिथिलेश कठाणे (१६) आणि अनुज राऊत (१५) व कॉफी मशिन आॅपरेटर देवेंद्र परिहार (२१) हे जखमी झाले. त्यांना खामला चौकातील आॅरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात श्रावणीचा हात तुटून पडला.
या घटनेनंतरही लग्नसमारंभ सुरू असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याशिवाय आणखी तिघे जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची सूचना मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)