किशोरदांच्या स्वरांनी सजलेले बर्मन्स संगीत
By Admin | Updated: October 17, 2014 01:04 IST2014-10-17T01:04:34+5:302014-10-17T01:04:34+5:30
मेलोडियस वाद्यांच्या संगीतात गीताचा शब्द त्याच्या आशयासह पोहोचविणारे संगीतकार एस. डी. बर्मन आणि पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असणारे पण भारतीय संगीताचे फ्युजन

किशोरदांच्या स्वरांनी सजलेले बर्मन्स संगीत
आदित्य-अनघाचे आयोजन : सूरसंगम संस्थेचे सुरेल सादरीकरण
नागपूर : मेलोडियस वाद्यांच्या संगीतात गीताचा शब्द त्याच्या आशयासह पोहोचविणारे संगीतकार एस. डी. बर्मन आणि पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असणारे पण भारतीय संगीताचे फ्युजन चपखलपणे गीतातून पकडत रसिकांची लय नेमकेपणाने सांभाळणारे संगीतकार आर. डी. बर्मन म्हणजे भारतीय चित्रपट संगीताचे बादशहाच. या पितापुत्रांनी अवीट माधुर्याच्या संगीताने गीते अजरामर करून ठेवलीत. पिढ्या बदलल्या, संगीताचे प्रवाहही बदलत गेले पण गीतांचा अर्थ, आशय, भावना संगीतातून व्यक्त करताना थेट रसिकांच्या भावनांना हात घालणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांवर कायमच रसिकांनी प्रेम केले. बर्मन्सची गीते ऐकणे हा रसिकांसाठी आनंददायी अनुभव असतो. हाच अनुभव आज रसिकांनी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात घेतला.
आदित्य-अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने ‘बर्मन्स किशोरदा विथ सागर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना अनघा सराफ आणि विशाल गुरव यांची होती. यापूर्वीही आदित्य-अनघाने एस. डी आणि आर. डी या संकल्पनेवर केलेला कार्यक्रम गाजला होता. तर आज बर्मन्स आणि किशोरदा असे समीकरण सादर करण्यात आले. सूरसंगमचे तयारीचे वादक आणि विदर्भाचा किशोरकुमार सागर मधुमटके तसेच सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांच्या गायनाने हा कार्यक्रम बर्मन्सच्या संगीताचा पुन:प्रत्यय देणारा ठरला. सागरने ‘फुलों के रंग से दिल की कलम से..’ या गीताने प्रारंभ केला आणि जवळपास प्रत्येक गीताला दाद देत रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. दोन्ही गायकांचे हसत - खेळत झालेले सादरीकरण आणि श्वेता शेलगावकर यांचे बर्मन्स आणि किशोरदा यांच्या नात्यावर भाष्य करणारे निवेदन यामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. अनेक दर्दी रसिक यावेळी वन्समोअरची मागणी करीत होते.
याप्रसंगी ‘गुम है किसी के प्यार मे..., ख्वाब हो तुम या.., कहना है..., माना जनाब ने पुकारा नही.., रुक जाना ओ जाना जरा दो बाते.., आँखो मे क्या जी.., सागर जैसी आँखो वाली.., हाल कैसा हे जनाब का.., फिर वही रात है.., अरे यार मेरी..., हवा के साथ साथ, रुप तेरा मस्ताना, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.., खिलते है गुल यहां.., ये जवानी है दिवानी, छोड दो आंचल जमाना क्या कहेगा.., हमे तुमसे प्यार कितना...’आदी गीते याप्रसंगी सागर आणि सुरभीने सादर केली. एस. डी. आणि आर. डी. यांचे संगीत त्यात किशोरदांसारखा हरहुन्नरी गायक आणि बर्मन्स आणि किशोरदांच्या जुळलेल्या समीकरणांची ही गीते दाद द्यायला भाग पाडणारी होती. मानवी जीवनातल्या प्रत्येक भावनेला हात घालणाऱ्या या गीतांनी उपस्थितांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी ‘ये मैने कसम ली, कांची रे कांची रे, कोरा कागज था ये मन मेरा, वादा करो नही छोडेंगे..., तेरे मेरे मिलन की ये बेला, आप की आँखो मे..., ये लाल रंग कब मुझे..., नदियां से दरिया...’ आदी गीतांनी रंगत आणली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सचिन ढोमणे यांचे होते. गायकांना कीबोर्डवर महेंद्र ढोले, मायनर विक्रम जोशी, आॅक्टोपॅड नंदू गोहाणे, व्हायोलीन अमर शेंडे, बासरी अरविंद उपाध्ये, गिटार प्रसन्न वानखेडे, संजय गाडे आणि ढोलकीवर पंकज यादव यांनी सुरेल साथ केली.
रंगमंच सजावट सुनील हमदापुरे, प्रकाशयोजना शिवशंकर माळोदे आणि ध्वनी स्वप्नील उके यांचे होते. कार्यक्रमाचे संयोजन, समन्वयन मो. सलीम यांनी केले. (प्रतिनिधी)