पारडीत दोन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:49+5:302021-02-05T04:48:49+5:30
पंकज जयकुमार बघेल (वय २०) हा नागेश्वरनगर बिडगाव येथे राहतो. ३१ जानेवारीला दुपारी १२.३०च्या सुमारास त्याची आई दाराला कुलूप ...

पारडीत दोन ठिकाणी घरफोडी
पंकज जयकुमार बघेल (वय २०) हा नागेश्वरनगर बिडगाव येथे राहतो. ३१ जानेवारीला दुपारी १२.३०च्या सुमारास त्याची आई दाराला कुलूप लावून बाहेर गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता त्या घरी परतल्या असता दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातील रोख ३ हजार, सोन्याचांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली.
बघेल यांच्या शेजारी राहणारे राम नत्थूजी कावळे यांच्याही घरात चोरटे शिरले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि डब्यात लपवून ठेवलेले ८,५०० रुपये असा एक ते दीड लाखांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही प्रकरणात पारडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----
चोरट्यांची हातसफाई
गळ्यातून सोनसाखळी काढून घेतली
नागपूर : आठवडी बाजारात कपड्याची लेस घेत असलेल्या महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी बेमालूमपणे सोनसाखळी काढून घेतली. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ७च्या सुमारास ही घटना घडली.
शांतीनगर कॉलनीत राहणाऱ्या निर्मला बट्टूलाल अग्रवाल (वय ६२) या सोमवारी पारडीच्या आठवडी बाजारात कपड्याची लेस घेत होत्या. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी बेमालूमपणे काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
----
वरूडच्या महिलेची पर्स लंपास
नागपूर : वरूड (जि. अमरावती) येथील एका महिलेच्या पर्समधील दीड लाखांचे सोन्याचे दागिने धावत्या ऑटोत एका महिलेने लंपास केले. सोमवारी दुपारी २.३० ते २.४५च्या सुमारास ही घटना घडली.
अमरावती जिल्ह्यातील वरूडच्या कीर्ती देविदास खोडे (वय ४४) सोमवारी दुपारी आपल्या गावाला जाण्यासाठी निघाल्या. त्या थ्रीसीटर ऑटोतून पडोळे चौकातून सीताबर्डीत आल्या. झांशी राणी चौकात त्यांनी आपली पर्स तपासली असता त्यातील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ऑटोत त्यांच्यासोबत एक महिला बसून होती. तिनेच हे दागिने चोरले असावेत, असा संशय आहे. धंतोली पोलीस ठाण्यात खोडे यांनी तक्रार नोंदवली. पोलीस चोरीचा तपास करीत आहेत.
----