नागपुरात चोरटे सैराट, वर्षभरात घरफोडीच्या घटनांमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ

By योगेश पांडे | Updated: January 16, 2025 00:31 IST2025-01-16T00:30:57+5:302025-01-16T00:31:22+5:30

वाहनचोरांचादेखील सुळसुळाट : महिलादेखील घरफोड्यांमध्ये सक्रिय

Burglary rampage in Nagpur, more than 10 percent increase in burglary incidents in a year | नागपुरात चोरटे सैराट, वर्षभरात घरफोडीच्या घटनांमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ

नागपुरात चोरटे सैराट, वर्षभरात घरफोडीच्या घटनांमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ

नागपूर : मागील काही वर्षांपासून नागपुरात घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत असून चोरटे उघडपणे जणू पोलिस प्रशासनाला आव्हान देत आहेत. मागील वर्षभरातदेखील हेच चित्र कायम राहिले. २०२३ च्या तुलनेत मागील वर्षात घरफोडीच्या घटनांमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मे आणि जून महिन्यांत तर घरफोडीच्या घटनांनी शंभरी गाठली होती. या आकडेवारीवरून पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

२०२४ मध्ये शहरात जवळपास हजाराहून अधिक घरफोड्यांची नोंद झाली. २०२३ मध्ये हाच आकडा ९१४ इतका होता. वर्षभरातच घरफोडीच्या घटनांमध्ये सुमारे १० टक्क्यांची वाढ दिसून आली. बहुतांश घरफोडीच्या घटना या शहराच्या सीमाभागात असलेल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झाल्या. त्यात प्रामुख्याने हुडकेश्वर, बेलतरोडी, वाठोडा, एमआयडीसी, कळमना या पोलिस ठाण्यांचा समावेश होता.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत अक्षरश : हैदोस

‘लोकमत’कडे असलेल्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये वर्षभरातील प्रत्येक महिन्याच्या घरफोडीच्या घटनांची सरासरी ८३ ते ८५ इतकी होती. मात्र उन्हाळ्यातील मे, जून या दोन महिन्यांची सरासरी १०७ इतकी होती. मे महिन्यात १११ तर जून महिन्यांत १०२ घरफोडींची नोंद करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात निवडणूक असूनदेखील घरफोडीच्या ६७ गुन्ह्यांची नोंद झाली. उन्हाळ्यात कूलर सुरू असल्यामुळे बाहेरील आवाज लवकर आत येत नाही. शिवाय सुट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी जातात. याचाच फायदा चोरटे उचलतात, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

२८० हून अधिक आरोपींचा शोध

वर्षभरातील घरफोडीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी २८० हून अधिक आरोपींचा शोध घेतला. त्यात तीन महिलांचादेखील समावेश होता. मध्य प्रदेश व आणखी राज्यातून नागपुरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांचादेखील पोलिसांनी भंडाफोड केला.

वाहनचोऱ्यांच्या पोलिसांना वाकुल्याच

२०२३ च्या तुलनेत शहरात २०२४ मध्ये वाहनचोरीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली. २०२३ मध्ये शहरात १ हजार ८०९ वाहनांची चोरी झाली होती व दर महिन्याची सरासरी दीडशे चोरी इतकी होती. २०२४ मध्ये वर्षभरात जवळपास १ हजार ९०० वाहनांच्या चोरींची नोंद झाली व चोरट्यांनी दर दिवसाला पाचहून अधिक दुचाकी लंपास केल्या. शहरातील बाजारपेठा, मेट्रो स्थानकांची पार्किंग चोरट्यांनी टार्गेट केले होते.

अशा झाल्या महिनानिहाय घरफोडी

महिना : २०२४ : २०२३
जानेवारी : ५३ : ७५
फेब्रुवारी : ७५ : ६४
मार्च : ९० : ५४
एप्रिल : ६७ : ५१
मे : १११ : १०५
जून : १०२ : १०७
जुलै : ९९ : ७३
ऑगस्ट : ८२ : ८१
सप्टेंबर : ९९ : ६९
ऑक्टोबर : ६३ : ७०
नोव्हेंबर : ८९ : ८६
डिसेंबर : ७३ : ७८

Web Title: Burglary rampage in Nagpur, more than 10 percent increase in burglary incidents in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.