दागिने आणि रक्कम घेऊन महिलेला दिले कागदाचे बंडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST2021-06-26T04:07:57+5:302021-06-26T04:07:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चार लाख रुपये सापडले, ते आपण वाटून घेऊ, असे म्हणत एका महिलेसह तीन आरोपींनी ...

दागिने आणि रक्कम घेऊन महिलेला दिले कागदाचे बंडल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - चार लाख रुपये सापडले, ते आपण वाटून घेऊ, असे म्हणत एका महिलेसह तीन आरोपींनी एका महिलेचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम काढून घेतली. बदल्यात महिलेला कागदाचे बंडल आणि सुपारीचे तुकडे देऊन तिची फसवणूक केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १.१५ ते १.३० च्या सुमारास ही घटना घडली.
म्हाळगीनगर चाैकाजवळ राहणाऱ्या लताबाई दिलीप दांडेकर (वय ५२) या गुरुवारी दुपारी दुधाची पिशवी घेऊन घरी जात होत्या. त्यांना बाजूच्या सभागृहामागे एक महिला तसेच दोन पुरुषांनी थांबविले. आम्हाला चार लाख रुपये सापडले आहे. ज्या मुलाची ही रक्कम आहे, त्याला आपण ५० ते ६० हजार रुपये देऊ आणि उर्वरित रक्कम आपण सर्व वाटून घेऊ, असे या आरोपींनी लताबाई यांना सांगितले. यातील एका आरोपीने त्यातील महिला आपली आई असून, तिला १५०० रुपये द्या आणि मोकळे करा. तिच्यावर आपला विश्वास नाही, अशीही बतावणी केली. आरोपींच्या गोड गोड बोलण्याने लताबाईने त्यांच्यावर विश्वास ठेवून एका आरोपीला १५०० रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळचे सोन्याचे दागिने काढून ते एका रुमालमध्ये बांधले. ते एका पिशवीत टाकण्याचा बनाव केला. आतमध्ये नोटांचे बंडल आहे, असे सांगून ती पिशवी लताबाई यांच्या हातात दिली. त्यांना ऑटोत बसवून रवाना केले. काही अंतरावर लताबाईंनी पिशवी बघितली असता त्यात बारीक गिट्टी, सुपारीचे तुकडे तसेच कागदाचे बंडल आढळले. दागिने आणि रक्कम घेऊन आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----