भ्रष्ट व्यापाऱ्यांना दणका
By Admin | Updated: January 22, 2016 03:32 IST2016-01-22T03:32:22+5:302016-01-22T03:32:22+5:30
आवेष्टित वस्तूवरील छापील किमतीपेक्षा जादा दराने वस्तूंची विक्री करणाऱ्या भ्रष्ट व्यापाऱ्यांवर वैधमापन विभागाने

भ्रष्ट व्यापाऱ्यांना दणका
नागपूर : आवेष्टित वस्तूवरील छापील किमतीपेक्षा जादा दराने वस्तूंची विक्री करणाऱ्या भ्रष्ट व्यापाऱ्यांवर वैधमापन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. १९ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेकडो आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. अचानक सुरू झालेल्या विभागाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
वैधमापन शास्त्र विभाग महाराष्ट्र राज्याचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात कारवाया सुरू झाल्या आहेत. या कारवाईत एमआरपी पेक्षा जास्त किमतीत वस्तूची विक्री, आवेष्टित वस्तू नियमांचा भंग यात आवेष्टित वस्तूवर एमआरपी, पॅकिंगची तिथी, निर्मात्याचा पत्ता, वस्तूचे वजन, कस्टमर केअर नंबर व वस्तूचे नाव नमूद नसल्यास ही कारवाई करण्यात येत आहे. नागपूरचे सहायक नियंत्रक यांच्याकडे नागपूर व वर्धा जिल्ह्याचा चार्ज आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईत शेकडो विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काजू-किसमिस पॅकेट, शितपेय, नमकीन, आईस्क्रीम, इलेक्ट्रीक स्विचेस, माचिस व औषधांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ९० च्या वर कारवाया करण्यात आल्या आहेत. तर वर्धा जिल्ह्यात १४ कारवाया झाल्या आहेत. एमआरपीपेक्षा जास्त कि मतीत वस्तू विकण्याच्या प्रकरणात दोन हजार रुपयापर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तर आवेष्टित वस्तू नियमांचा भंग केल्या प्रकरणात दहा हजार रुपयावर दंडात्मक वसुली करण्याची तरतूद आहे. यात विक्रेता, निर्माता कंपनी व वितरकांवर सुद्धा कारवाई होते.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये
आवेष्टित वस्तू ह्या ग्राहकांच्या अनुपस्थितीत पॅकिंग होतात. ग्राहक हक्क कायद्यानुसार निर्मात्याने, विक्रेत्यांने ती वस्तू योग्य वजनात व ठरवून दिलेल्या किमतीत ग्राहकांना उपलब्ध करावी. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. अनेक वस्तूंच्या बाबतीत ग्राहकांची फसवणुक होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे.
-सुनील पलिये, सहायक नियंत्रक