दहन घाटावर गुंडांची दहशत
By Admin | Updated: November 19, 2014 00:50 IST2014-11-19T00:50:44+5:302014-11-19T00:50:44+5:30
अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या कुटुंबीयांना व नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दहन घाटावर महापालिकेतर्फे सुविधा पुरविल्या जातात. यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो.

दहन घाटावर गुंडांची दहशत
महापौरांनी घेतला आढावा : व्यवस्था सुधारण्याचे निर्देश
नागपूर : अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या कुटुंबीयांना व नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दहन घाटावर महापालिकेतर्फे सुविधा पुरविल्या जातात. यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. परंतु गंगाबाई व अंबाझरी घाटावर असामाजिक तत्त्वांचा वावर असून येथे गुंडांची प्रचंड दहशत आहे. मंगळवारी महापौर प्रवीण दटके यांनी या घाटांना दौरा क रून आढावा घेतला असता त्यांच्याही निदर्शनास ही बाब आली.
गंगाबाई घाटाचे निरीक्षण केले असता धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. येथे लाकूड व गोवऱ्यांचे वजनमाप होत नाही. लाकडे व गोवऱ्या बेवारस असल्याने त्या चोरीला जातात. गुंडांच्या दहशतीमुळे मनपाचे कर्मचारी येथे काम करण्यात उत्सुक नाही. अंत्यविधीसाठी कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याचे आढळून आले.
हा प्रकार खपवून घेणार नसल्याची तंबी दटके यांनी दिली. सुलभ शौचालयाच्या मागील दारातून गुंड प्रवृत्तीचे लोक घाटावर शिरतात. मनपा कर्मचाऱ्यांना धमकावतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांत दहशतीची वातावरण आहे.
यासंदर्भात पोलिसांकडे वारंंवार तक्र ारी केल्यानंतरही कोणतीच कारवाई होत नाही, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. या घाटावर सर्वत्र गवत व झुडपे वाढलेली आहेत. बगिचाची देखभाल होत नाही. गार्डच्या खोलीवर कब्जा करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी टाके उघडे असल्याचे आढळून आले. यावर दटके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अंबाझरी घाटाची पाहणी केली येथेही असाच प्रकार निदर्शनास आला. घाटाच्या जागेत गायीचा गोठा उभारण्यात आला आहे. गुरांना आणण्यासाठी येथे बाजूची भिंत पाडण्यात आली आहे. घाटावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. येथे असामाजिक तत्त्व वाढीस लागल्याने सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दटके यांनी दिले.
मोक्षधाम घाटावर पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे आढळून आले. गार्डनवरील हिरवळ वाळत चालल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी टाईल्स निघालेल्या आहेत. ओसीडब्ल्यूकडून पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्र ारी आहेत. बांंधकामाचे साहित्य ठिकठिकाणी ठेवण्यात आले आहे. ते हटविणयाचे निर्देश दटके यांनी दिले. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकु लवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे, यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक, मनपाच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सहायक आयुक्त पालक
घाटांची देखभाल व सुविधांची जबाबदारी संबंधित झोनचे सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. घाटाच्या दर्शनी भागावर फलक लावून त्यावर घाटाचे पालक म्हणून सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, ओसीडब्ल्यूचे अधिकारी, बांधकाम व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील अशी माहिती दटके यांनी दिली.