इमारती सागवान दाखविले जळाऊ
By Admin | Updated: May 19, 2016 03:00 IST2016-05-19T03:00:36+5:302016-05-19T03:00:36+5:30
बाजारपेठेत सोन्यासारखा भाव असलेल्या अस्सल इमारती सागवान लाकडाला जळाऊ दाखवून त्याची अवैध वाहतूक करण्याचा ...

इमारती सागवान दाखविले जळाऊ
कऱ्हांडला अभयारण्यात अवैध वृक्षतोड : लाकूड तस्करांचा असाही चमत्कार
अभय लांजेवार/शरद मिरे उमरेड
बाजारपेठेत सोन्यासारखा भाव असलेल्या अस्सल इमारती सागवान लाकडाला जळाऊ दाखवून त्याची अवैध वाहतूक करण्याचा गोरखधंदा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरात ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच या धंद्यातील दोन नंबरी दलालांचे-अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. इमारती सागवानची वाहतूक करायची आणि जळाऊ लाकडाची वाहतूक केल्याची एन्ट्री मारायची, अशा या गंभीर प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत याचा छडा लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या आणि भिवापूर येथून १० किमी अंतरावर असलेल्या पाऊणगाव शिवारात महिनाभरापासून सागवानावर आरी चालविण्याचे काम सुरू होते. मरू नदीच्या काठावर तसेच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसराने वेढलेला हा भाग गावकुसाबाहेर असल्याने याठिकाणी फारसे कुणीच भटकत नाही. याचाच लाभ पदरात पाडून घेत झाडे तोडण्याचे पाप करण्यात आले. अशाही परिस्थितीत लोकमतने ‘आॅन दी स्पॉट’ गाठत सागवन कत्तल प्रकरण उजेडात आणले.
गेट बाहेर अन् गाव आत
पाऊणगाव हे सुमारे ४५० लोकवस्तीचे गाव अभयारण्याने वेढले आहे. काही अंतरावरच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे चेक पोस्ट आहे. या ठिकाणी ये-जा करताना नोंदवहीत नोंद करावी लागते. याशिवाय आत-बाहेर जाता येत नाही. हे गेट गावाबाहेर अन् गाव आत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना वनविभागाच्या हिटलरशाहीला नेहमीच तोंड द्यावे लागते.
१८ वाहनांची नोंद
मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते आजतागायत सागवान आणि जळाऊ लाकडाच्या १८ वाहनांची नोंद चेक पोस्टवरील नोंदवहीत करण्यात आली आहे. यापैकी बहुतेक नोंदी अर्धवट आहेत. या नोंदीत मालाचा तपशील, दिनांक आणि वेळ नमूद नाही. याबाबतचा लोकमतकडे पुरावा उपलब्ध आहे. या नोंदीनुसार आतापर्यंत इमारती सागवान २७.४९३ घनमीटर तसेच जळाऊ आणि चॉक टिंबरची वाहतूक ३०.५ भर (जळाऊ लाकडाचा ढीग) करण्यात आली आहे. भिवापूर येथील वन विभागाच्या चमूने १५ मे रोजी अवैध सागवान वाहतुकीचा भंडाफोड केला. यामध्ये इमारती लाकडाला जळाऊ दाखविण्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे १८ वाहनांमधून असा प्रकार करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हा सारा प्रकार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या चेक पोस्ट मधून होत असताना या भागाचे वनपरिक्षेत्राधिकारी गोविंदा फागोजी लुचे यांच्या कसे लक्षात आले नाही, असा सवाल विचारला जात आहे. प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून योग्य दिशेने तपास झाल्यास या संपूर्ण प्रकरणाचे पितळ उघडे पडणार आहे. शिवाय, वन आणि वन्य जीवांसाठी काम करण्याचा आव आणणाऱ्यांचाही बुरखा फाटेल, असे बोलल्या जात आहे.