इमारतीचा ‘लूक’ बदलणार
By Admin | Updated: August 2, 2015 03:09 IST2015-08-02T03:09:58+5:302015-08-02T03:09:58+5:30
महात्मा फुले भाजी बाजाराच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले.

इमारतीचा ‘लूक’ बदलणार
महात्मा फुले भाजीबाजार : पालकमंत्री बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर : महात्मा फुले भाजी बाजाराच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले.
रविभवन येथे आयोजित एका बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महात्मा फुले भाजी बाजाराच्या इमारतीबाबतची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर उपरोक्त निर्देश दिले. यावेळी आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष रमेश शिंगारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते. ५ वर्षे टिकेल अशा पद्धतीने इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. सध्या इमारतीवरील झाडे कापण्यात आली. अनेक ठिकाणी प्लॅस्टर करून इमारतीची डागडुजी करण्यात आली आहे. गडरच्या टाक्या, शौचालय व बाथरुमची दुरुस्ती करण्यात आली आहे, असे या बैठकीत हर्डीकर यांनी सांगितले.
महात्मा फुले बाजार १२ एकर परिसरात पसरलेला आहे. यातील २.३० एकर जागेवर दर्शनी भागात महात्मा फुले बाजार भवन, ४.३० एकर जागेवर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरतर्फे नियंत्रित भाजी बाजार व ५.४० एकर जागेवर सार्वजनिक वाहन तळ आहे.
महात्मा फुले बाजारात पूर्वी १९९२ पर्यंत भाजी व फळांची ठोक व चिल्लर विक्री होत असे. १९९० मध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कळमना येथे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ व केंद्र अस्तित्वात आल्याने महात्मा फुले बाजारातील आलू कांद्याचा ठोक व्यवसाय तिथे हलविण्यात आला. परंतु भाजीपाल्याचा ठोक व चिल्लर विक्री व्यवसाय येथेच सुरू आहे.
नागपूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी ३१ डिसेंबर १९९२ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार भाजीपाल्याचे खरेदी विक्री मुख्य बाजार क्षेत्र कळमना बाजार म्हणून घोषित केलेले आहे.
२१ डिसेबर २००१ रोजी अधिसूचना काढून महात्मा भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा दुय्यम बाजार म्हणून यापुढेही अस्तित्वात राहील, असे जाहीर केले आहे. सद्य परिस्थितीत फुले मार्केट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजी उपबाजार २१ डिसेंबर २००१ च्या अधिसूचनेनुसार कायम असल्याने हा बाजार सुरू आहे. नागपूर महापालिकेतर्फे सध्याचे भाजी मार्केट व बाजूच्या परिसरात अद्ययावत बाजार व अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्मितीची योजना तयार केलेली आहे, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. (प्रतिनिधी)