बिल्डरने पार्टनरवर केला अत्याचार
By Admin | Updated: March 16, 2017 02:15 IST2017-03-16T02:15:17+5:302017-03-16T02:15:17+5:30
पाचपावलीतील एका बिल्डरवर त्याच्या महिला पार्टनरने अत्याचाराचा आरोप केला आहे.

बिल्डरने पार्टनरवर केला अत्याचार
नागपूर : पाचपावलीतील एका बिल्डरवर त्याच्या महिला पार्टनरने अत्याचाराचा आरोप केला आहे. या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. सुधीर मदनलाल गुप्ता (५२) रा. भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, रामदासपेठ असे आरोपीचे नाव आहे.
गुप्ताची पाचपावलीतील कश्मिरी गल्ली येथे फ्लॅट स्कीम सुरू आहे. पीडित ४८ वर्षीय महिला या स्कीममध्ये गुप्ताची पार्टनर आहे. तिचे पती सैन्यात आहेत. यामुळे पीडित महिलाच व्यवसाय सांभाळते. गुप्ताने ग्राहकांना दाखविण्यासाठी अपार्टमेंटमध्ये एक सॅम्पल फ्लॅट तयार केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार १० मार्च रोजी दुपारी गुप्ताने याच सॅम्पल फ्लॅटमध्ये तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या घटनेची पोलिसात तक्रार केल्यास चेहऱ्यावर तेजाब फेकण्याची धमकी दिली. या धमकीमुळे पीडित महिला घाबरली. तिने मंगळवारी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार दोघांची चांगली पार्टनरशीप होती. त्यांनी पाचपावली येथील एका हॉटेल व्यवसायात असलेल्या कुटुंबाकडून जमीन खरेदी करून दीड वर्षांपूर्वी फ्लॅट स्कीम सुरू केली होती. तांत्रिक कारणामुळे ही स्कीम योजनेनुसार पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे फ्लॅट विकण्यात अडचणी येऊ लागल्या. दरम्यान नोटाबंदी झाल्याने ग्राहक मिळेनासे झाले. यामुळे पीडित महिला व गुप्ता यांच्यात पैशावरून वाद सुरू होता. हा वाद सोडविण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पीडित महिला एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याच्या नेत्यांनीही वाद सोडवण्याचे प्रयत्न केले.(प्रतिनिधी)