बिल्डरने केले दाम्पत्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 02:46 IST2016-09-04T02:46:25+5:302016-09-04T02:46:25+5:30
अजनी पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वरी रोड काशीनगर येथील एका दाम्पत्याचे भूखंड हडपण्यासाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बिल्डरने केले दाम्पत्याचे अपहरण
भूखंड हडपण्याचा आरोप : अजनीत गुन्हा दाखल
नागपूर : अजनी पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वरी रोड काशीनगर येथील एका दाम्पत्याचे भूखंड हडपण्यासाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. करण नामदेवराव महल्ले (४५) असे आरोपीचे नाव आहे.
सूत्रानुसार बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे विश्वासू सहकारी दिवंगत डॉ. पंढरीनाथ वैद्य यांचा काशीनगर चौकात साडेचार हजार वर्गफुटाचा भूखंड आहे. या ठिकाणी ते कुटुंबासह राहत होते. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्या घरासमोरच कांशीराम यांना एक खोली पक्ष कार्यालयासाठी दिली होती. सन २०१२ मध्ये डॉ. पंढरीनाथ वैद्य यांचा मृत्यूनंतर त्यांची पत्नी, दोन मुलं आणि मुलगी त्याच घरात राहत होते. परंतु काही दिवसानंतर मुलगा अतुल वैद्य हा पत्नी वंदनासोबत त्याच घरातील दुसऱ्या खोलीत वेगळा राहू लागला होता. काही दिवसांपूर्वी बिल्डरने अतुलची आई व कुटुंबीयांसोबत भूखंडाचा सौदा केला. कार्यालयाच्या जागेऐवजी इमारतीमध्ये जागा देण्यासंबंधी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत करार केला. परंतु अतुल आपली खोली रिकामी करायला तयार नव्हता.
गेल्या १२ आॅगस्ट रोजी रात्री बिल्डरचे काही लोकं आले. त्यांनी अतुल व त्याच्या पत्नीला खोली खाली करायला सांगितले. परंतु त्यांनी नकार दिला.
त्यामुळे त्यांनी अतुल व त्याच्या पत्नीला बळजबरीने नेले. तेव्हापासून ते दोघेही बेपत्ता आहेत. अतुल यांचे साळे गौतम खडतकर यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिल्डर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)