चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला इमारत द्या
By Admin | Updated: July 3, 2014 00:55 IST2014-07-03T00:55:46+5:302014-07-03T00:55:46+5:30
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महिला व बाल रुग्णालयाची इमारत मिळाल्यास यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश देणे शक्य आहे.

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला इमारत द्या
हायकोर्टात याचिका : राज्य शासनाला मागितले उत्तर
नागपूर : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महिला व बाल रुग्णालयाची इमारत मिळाल्यास यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश देणे शक्य आहे. यासाठी राहुल पुगलिया व रामदास वागदरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने चंद्रपूर येथे १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेचे महाविद्यालय व ५०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी २०१३ रोजी जीआर काढण्यात आला आहे. महाविद्यालय व रुग्णालयासाठी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. कर्मचारी नियुक्ती व अन्य सुविधांसाठी निधी मिळाला आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने महाविद्यालयाचे निरीक्षण केले आहे. परंतु महाविद्यालयाची स्वत:ची इमारत बांधण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. चंद्रपूर येथे महिला व बाल रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. ही इमारत तात्पुरती महाविद्यालयाला दिल्यास यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांना नोटीस बजावून एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अनिल किलोर व अॅड. दीपाली सपकाळ यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)