विरोधकांनी फोडला बजेटचा फुगा
By Admin | Updated: July 8, 2014 01:37 IST2014-07-08T01:27:22+5:302014-07-08T01:37:13+5:30
स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मांडलेले १६४५ कोटींचे बजेट तब्ब्ल साडेनाऊ तासाच्या चर्चेनंतर सभागृहात मंजूर करण्यात आले. चर्चेदरम्यान विरोधकांनी बजेटचा फुगा फोडला.

विरोधकांनी फोडला बजेटचा फुगा
१६४५ कोटींचे बजेट मंजूर : काँग्रेसचा सभात्याग
नागपूर : स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मांडलेले १६४५ कोटींचे बजेट तब्ब्ल साडेनाऊ तासाच्या चर्चेनंतर सभागृहात मंजूर करण्यात आले. चर्चेदरम्यान विरोधकांनी बजेटचा फुगा फोडला. तिजोरीत पैसा नाही. अर्थसंकल्पात उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाय सुचविलेले नाहीत. फक्त आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून घोषणांसाठी बजेटचा आकडा वाढविण्यात आला, अशी टीका करीत विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दीपक कापसे, गुड्डू तिवारी आदींनी अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रश्नचिन्ह लावले. तर, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, सुनील अग्रवाल, नासुप्रचे विश्वस्त छोटू भोयर, संदीप जोशी, अविनाश ठाकरे,सुधाकर कोहळे आदींनी विरोधकांची टीका खोडून काढत अर्थसंकल्पात व्यक्त केलेला उत्पन्नाचा अंदाज गाठला जाईल, असा दावा केला. विकास ठाकरे म्हणाले, आयुक्तांनी दिलेल्या अर्थसंकल्पापेक्षा तब्बल ५०० कोटींना जास्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या योजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. महापालिकेचे पदाधिकारी जनतेची कामे करण्यासाठी संवेदनशील नाहीत. २४ बाय ७ च्या नावाखाली जनतेची पिळवणूक केली जात आहे. पायलट झोनमध्ये चार तासही पाणी मिळत नाही. जलवाहिनी असलेल्या भागात ओसीडब्ल्यू टँकरने पाणीपुरवठा करून पैसे उकळत आहे. याला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरात अवैध बाजार सुरू आहे. तेथे काही लोक अवैध वसुली करीत आहेत. नागनदी शुद्धीकरणासाठी पैसा खर्च केला. मात्र, नदीत सोडले जात असलेले गटाराचे पाणी बंद करण्यात आलेले नाही. तिजोरी भरण्यासाठी कुठलाही उपाय सुचविलेला नाही, अशी टीका करीत ठाकरे यांनी सभात्याग केला.
प्रफुल्ल गुडधे यांनी अर्थसंकल्पातील बारकावे अभ्यासपूर्ण मांडत विरोधकांवर दुटप्पीपणाचा ठपका ठेवला. ते म्हणाले, मालमत्ता करापासून २५० कोटींचे उत्पन्न गृहित धरले. मात्र, भांडवली मूल्याबाबत काहीच निर्णय घेतला नाही. एलबीटीपासून ५०० कोटी उत्पन्न धरले, पण प्रत्यक्षात भाजपनेच एलबीटीला विरोध केला होता. आता मात्र, अर्थसंकल्पात व्यापारीविरोधी भूमिका घेतली आहे. गेल्या १० वर्षांपासून शहर विकासाचा आराखडा पूर्ण झालेला नाही. आरोग्य सेवा मोडकळीस निघाली आहे. सर्व आरोग्य प्रकल्प पीपीपीवर करण्याचा प्रस्ताव आहे. दुर्बल घटकांचा हक्काचा निधी शुलभ शौचालय व ई- शौचालयाच्या नावावर वळविला जात आहे. महापालिकेने प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आणि एमपीएमसी प्रशिक्षणाच्या गोष्टी करताहेत, असा चिमटा त्यांनी काढला. महापौर २४ हजार झाडे लावल्याचे सांगतात, मात्र किती झाडे जगली याचा आकडा कुणीच देत नाहीत. मेट्रो प्रकल्पासाठी मनपाला ४५० कोटींचा वाटा द्यायचा आहे. मात्र, काहीच तरतूद केली नाही. लंडन स्ट्रीट, प्रभाग तेथे मंगल कार्यालय, सफाई कामगारांना घरे आदी घोषणा हवेतच विरल्या आहेत. आता पुन्हा नव्या घोषणा करून नागपूरचा चेहरा बदलण्याचा सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला दावा फसवा असल्याची टीका गुडधे यांनी केली. (प्रतिनिधी)
२४० स्टार बस दाखवा
राजीनामा देतो- ठाकरे
प्रत्यक्षात ३०० हून अधिक बस भंगार झाल्या आहेत. हिंगणा रोड व यशंवत स्टेडियमसमोर बंद अवस्थेत उभ्या आहेत. रस्त्यावर दीडशे ते पावणे दोनशेच बस धावत आहेत. त्यामुळे नागपूरकरांना बसमध्ये गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. वेळापत्रक पाळले जात नाही. स्टार बसमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी बोरकर हे नवी योजना देतील, असे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी २४० स्टार बस रस्त्यावर धावत असल्याचे नमूद करीत प्रवाशांची दिशाभूल केली आहे. सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर २४० बस दाखवाव्या, आपण त्वरित नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.