भाजप-काँग्रेसच्या असंतुष्टांवर बसपाची नजर
By Admin | Updated: January 12, 2017 01:54 IST2017-01-12T01:54:43+5:302017-01-12T01:54:43+5:30
बहुजन समाज पार्टी (बसपा) महापलिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असून यावेळी सुद्धा स्ट्रॅटेजीनुसार भाजपा-काँग्रेसमधील ज्येष्ठ असंतुष्टांवर बसपाची नजर आहे.

भाजप-काँग्रेसच्या असंतुष्टांवर बसपाची नजर
अद्याप पत्ते उघड नाही : सर्व जागा स्वबळावर लढणार
नागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) महापलिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असून यावेळी सुद्धा स्ट्रॅटेजीनुसार भाजपा-काँग्रेसमधील ज्येष्ठ असंतुष्टांवर बसपाची नजर आहे. तसेच तिकिटांसाठी पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बसपाने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाही. येत्या काही दिवसात बसपाच्या उमेदवारांच्या मुलाखतीलाही सुरुवात होईल.
सध्या बसपाचे महापलिकेत १२ नगरसेवक आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. यावेळी बसपाने महापौर बनाओ अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रदेश अध्यक्ष विलास गरुड हे गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत. मनपा निवडणुकीसाठी बसपाने पर्यवेक्षक व को-आॅर्डिनेटरची टीम तयार केली आहे. विधानसभा मतदार संघनिहाय ही टीम कार्यरत आहे. स्वच्छ प्रामाणिक चेहरा व हमखास निवडून येण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी (आर्थिक सक्षमतेसह) ज्या उमेदवाराकडे असतील अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. बसपाची सध्या कुणाशीही युती नाही. मात्र अलीकडेच भीमसेना या संघटनेने बसपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचप्रकारे आणखी काही संघटना बसपासोबत येणार असल्याचे सांगितले जाते.(प्रतिनिधी)
रविवारपासून मुलाखती राज्यभरातील नेते येणार
येत्या १५ जानेवारी रोजी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचा वाढदिवस आहे. पक्षातर्फे त्यांचा वाढदिवस जनकल्याणकारी योजना दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त नागपुरात चंद्रमणी चौकात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, प्रभारी उपासक यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतरच मुलाखतीलाही सुरुवात होणार असल्याचे सांगितले जाते.