बसपाला खिंडार !

By Admin | Updated: June 29, 2015 02:53 IST2015-06-29T02:53:14+5:302015-06-29T02:53:14+5:30

बहुजन समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने व विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरातील बसपाचे

BSP Ropar! | बसपाला खिंडार !

बसपाला खिंडार !

सुरेश माने, गजभिये यांचा राजीनामा : दुसरा पक्ष काढण्याचे संकेत
नागपूर : बहुजन समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने व विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरातील बसपाचे उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत केली. २६ जुलै रोजी आरक्षण दिवसानिमित्त नाशिक येथे दोन दिवसीय परिषद आयोजित करून तीत पुढील राजकीय वाटचालीची भूमिका जाहीर केली जाईल. कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असे स्पष्ट करीत एक नवा पक्ष काढण्याचे संकेत त्यांनी दिले. अलीकडच्या काळात बसपातील ही मोठी बंडखोरी मानली जात आहे.
डॉ. सुरेश माने व किशोर गजभिये यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत काही दिवसांपूर्वी बसपामधून निलंबित करण्यात आले होते. या घडामोडीनंतर डॉ. माने व गजभिये यांनी रविवारी प्रसिद्धी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. डॉ. माने म्हणाले, आपण महाराष्ट्र प्रभारी म्हणून बसपाचा ग्राफ वाढविला. राज्यात बसपाची अधोगती थांबविण्यासाठी आपण राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना पाच पानांचे पत्र लिहून काही पावले उचलण्याची विनंती केली.
मात्र, या पत्रावर काहीच झाले नाही. अशात भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही जिल्ह्यात बसपाला चांगली मते मिळाली होती. असे असतानाही ७ जून रोजी प्रदेशाध्यक्षांनी मायावती यांच्या आदेशाचा हवाला देत गोंदिया, भंडाऱ्यात निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, हा निर्णय मान्य न करता स्थानिक कार्यकर्त्यांनी बहुजन समाज परिषदे(बसपा)च्या बॅनरखाली अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार केला. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण २६ जून रोजी भंडाऱ्यात गेलो व त्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे वृत्त वाचायला मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण कांशीरामजींचे अनुयायी आहोत. त्यामुळे आंबेडकरी विचार सोडणार नाही. बसपा, बामसेफ यासह विविध आंबेडकरी संघटना व इतर पक्षातून येणाऱ्यांना एकत्र करून २०१६-१७ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
किशोर गजभिये म्हणाले, आपण पदवीधर मतदारसंघ निवडणूक व त्यानंतर उत्तर नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढविली. चांगली मते घेतली. मात्र, त्यानंतरही पक्षातून का निलंबित करण्यात आले याचे कारण कळले नाही. पक्षाच्या सर्व बैठकांना आपण नियमितपणे उपस्थित राहिल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
गोंदिया- भंडाऱ्यात न लढण्यामागे अर्थकारण
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात विधानसभेत बसपाला चांगली मते मिळूनही जि.प.ची निवडणूक न लढण्याचा निर्णय बसपाच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केला. या मागे राजकारण व अर्थकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेत बसपाचे गजभिये यांच्यामुळे उत्तर नागपुरात एका दिग्गज नेत्याचे नुकसान झाले. तसेच नुकसान भंडारा- गोंदियातही झाले. त्यामुळे भंडारा- गोंदियात बसपाचे उमेदवार न लढविण्यामागे या ‘शक्तींचा’ही हात असू शकतो, असा सांकेतिक आरोपही डॉ. माने यांनी केला.

Web Title: BSP Ropar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.