बीएसएनएलच्या अभियंत्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 5, 2017 02:02 IST2017-03-05T02:02:04+5:302017-03-05T02:02:04+5:30
बुधवारपासून अचानक बेपत्ता झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मधील विभागीय अभियंता

बीएसएनएलच्या अभियंत्याची आत्महत्या
नागपूर : बुधवारपासून अचानक बेपत्ता झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मधील विभागीय अभियंता गणेश पांडूरंग बारवदे (वय ५०, रा. हिंदुस्तान कॉलनी) यांचा त्यांच्याच कार्यालयात मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
सेमिनरी हिल्सच्या टीव्ही टॉवरजवळ भास्कर भवन असून तेथे रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर आहे. बारवदे यांच्याकडे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ड्युटी निश्चित करण्याची जबाबदारी होती. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास बारवदे यांनी त्यांच्या वरिष्ठांना बँकेचे काम आटोपून येतो, असे सांगितले. सायंकाळ झाली तरी कार्यालयात ते दिसले नाही. त्यानंतर घरीही ते पोहचले नाही, त्यामुळे घरच्या मंडळींनी कार्यालयातील सहकाऱ्यांकडे चौकशी केली. अचानक ते बेपत्ता झाल्यामुळे पत्नीने बुधवारी रात्री अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. दीड दिवस होऊनही त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याने अस्वस्थ झालेल्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल ट्रॅकिंगवर टाकला असता गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या मोबाईलचे लोकेशन कार्यालयीन परिसरातच दिसल्याने शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनाही बोलावून घेण्यात आले. कार्यालयाची कुलिंग सिस्टीम रूम उघडली असता त्यात ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले.
गुरुवारी मध्यरात्री १२.३० ला ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रसाद प्रभाकर सुपेकर (वय ५५, प्रणव अपार्टमेंट, व्यंकटेशनगर, खामला) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या आत्महत्या प्रकरणाची बीएसएनएलमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलीस चौकशी करीत आहेत.(प्रतिनिधी)