पतीच्या चारित्र्यावर संशय घेणारी पत्नी क्रूर

By Admin | Updated: March 13, 2017 02:07 IST2017-03-13T02:07:11+5:302017-03-13T02:07:11+5:30

पत्नी कोणताही ठोस पुरावा नसताना पतीच्या चारित्र्यावर संशय घेत असेल, तर ही कृती क्रूरतेमध्ये मोडते

Brutal wife suspecting her husband's character | पतीच्या चारित्र्यावर संशय घेणारी पत्नी क्रूर

पतीच्या चारित्र्यावर संशय घेणारी पत्नी क्रूर

हायकोर्टाचा निर्वाळा : घटस्फोटाविरुद्धचे अपील फेटाळले
नागपूर : पत्नी कोणताही ठोस पुरावा नसताना पतीच्या चारित्र्यावर संशय घेत असेल, तर ही कृती क्रूरतेमध्ये मोडते असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच, यासह अन्य विविध बाबी लक्षात घेता पतीला मिळालेला घटस्फोट कायम ठेवला आहे.
प्रकरणातील दाम्पत्य वैष्णवी व विशाल (काल्पनिक नावे) अनुक्रमे नागपूर व वाढोना (चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. त्यांचे २७ जुलै १९९२ रोजी लग्न झाले होते. वैष्णवी लग्नानंतर केवळ चार महिने विशालसोबत राहिली. ती विशालपेक्षा जास्त शिकलेली आहे. परिणामी तिला विशाल योग्य जोडीदार नसल्याचे वाटत होते. तिला खेड्यात राहणे आवडत नव्हते. ती क्षुल्लक कारणांवरून विशालसोबत भांडण करीत होती. त्याला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करीत होती. घरगुती कामे करीत नव्हती. मनात येईल तेव्हा माहेरी जात होती.
१९९४ मध्ये ती कायमची घर सोडून गेली. तेव्हापासून ती विशालसोबत रहात नाही. दरम्यान, दोघांनीही सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याकरिता विशालने वैष्णवीला तीन लाख रुपये द्यायचे असे ठरले होते. त्याप्रमाणे त्यांनी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली, पण प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर वैष्णवीने अधिक पैसे मिळण्याच्या लोभामुळे माघार घेतली. त्यानंतर विशालने वैष्णवीची क्रूरता व विभक्ततेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी याचिका दाखल केली. १७ एप्रिल २००८ रोजी कुटुंब न्यायालयाने ही याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध वैष्णवीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे निर्वाळा देऊन अपील फेटाळून लावले. (प्रतिनिधी)

निर्णयातील निरीक्षणे
पत्नीला केवळ पैशांत रुची असून तिला पतीसोबत राहण्याची इच्छा नाही. असे नसते तर तिने विवाहाधिकार प्राप्तीसाठी याचिका दाखल केली असती. लग्नानंतर ती केवळ चार महिने पतीसोबत राहिली. एवढ्या कमी कालावधीमध्ये कोणतीही सामान्य पत्नी तिच्या पतीला त्याच्या कमी शिक्षणावरून डिवचत नाही. सहमतीने घटस्फोट घेण्याचे ठरविल्यानंतर पत्नीने केवळ जास्त पैसे मिळविण्यासाठी माघार घेतली. पतीला पाठविलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये पोटगी मागितली, पण त्याच्यासोबत राहण्याचा विचार व्यक्त केला नाही. ती कोणतेही ठोस कारण नसताना पतीचे घर सोडून माहेरी राहायला गेली अशी निरीक्षणे न्यायालयाने निर्णयात नोंदविली आहेत.

Web Title: Brutal wife suspecting her husband's character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.