कुख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:52+5:302021-01-13T04:17:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - अनेक दिवसांपासून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका कुख्यात गुंडाची बापलेकांनी एका साथीदाराच्या मदतीने निर्घृण ...

The brutal murder of a notorious criminal | कुख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या

कुख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अनेक दिवसांपासून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका कुख्यात गुंडाची बापलेकांनी एका साथीदाराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू बालाजीनगरात रविवारी दुपारी १.४५ वाजता ही थरारक घटना घडली. सुमित पिंगळे (वय २३) असे मृताचे नाव आहे. तो चंद्रनगरात राहत होता.

देवेंद्र जोशी (वय ५२), निहाल देवेंद्र जोशी (वय २४) आणि ऋषभ राऊत (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सुमित हा कुख्यात गुंड होता. त्याची एका महिलेसोबत मैत्री होती. निहाल तिला आपल्यापासून दूर करतो, असा सुमितला संशय होता. महिलेचा मोबाईल चोरीला गेल्याने ती तक्रार नोंदवण्यासाठी अजनी ठाण्यात गेली होती तर, पत्नीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून निहालही पोलीस ठाण्यात गेला होता. त्याचवेळी ठाण्यात पोहचलेल्या सुमितने त्याची महिला मित्र आणि जोशी बापलेक ठाण्यात दिसल्याने चिडला होता. जोशी बापलेक आपल्याविरुद्ध तक्रार करायला गेल्याचा आणि निहालनेच महिलेलाही अजनी ठाण्यात तक्रार करण्यासाठी पाठविल्याचा संशय असल्याने सुमितने निहाल आणि त्याच्या वडिलांसोबत बुधवारी वाद घातला. त्यांना धमकावू लागला. तुम्हारा गेम कर दुंगा, असे जाता येता सुमित म्हणायचा. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी जोशी बापलेकाला दडपणात आणणारी ठरली.

देवेंद्र जोशी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात तर निहाल भाजी विकायचा. ऋषभही निहालसोबत भाजी विकायचा. जोशी बापलेकांनी घरचा एक गाळा राहुल नामक व्यक्तीला भाड्याने दिला होता. तेथे राहुलने न्यू मॉडर्न सलून नामक दुकान थाटले होते. रविवारी दुपारी सुमित या सलूनमध्ये पोहचला. तो कटिंगला बसल्याचे बघून निहालने वडिलांना सांगितले आणि आपल्या ऋषभ राऊत नामक मित्राला बोलवून घेतले. निहाल आणि ऋषभ लोखंडी रॉडआणि चाकू घेऊन सलूनमध्ये पोहचले. त्यांच्याशी सुमितची बाचाबाची सुरू झाली.

धोका लक्षात घेत सुमितने त्यांना धमकावून पळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात देवेंद्र जोशीही आतमध्ये आला. त्याने शटर बंद केले आणि आतमध्ये चाकू, रॉड तसेच कैचीचे घाव घालून सुमितला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या घटनेची माहिती अजनीत आगीसारखी पसरली. त्यामुळे अल्पावधीतच तेथे मोठी गर्दी जमली. अजनीचे ठाणेदार प्रदीप रायन्नावार, पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे, आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. त्यांनी सुमितचा मृतदेह मेडिकलला रवाना केला. दरम्यान, आरोपी स्वत:च पोलिसांकडे पोहचले. सुमितकडून जीवाला धोका होणार असल्यामुळेच त्याची हत्या केल्याची कबुली जोशी बापलेकांनी दिली.

---आधी बापावर हल्ला, नंतर मुलाची हत्या

आरोपी सुमितवर हत्या, हत्येचा प्रयत्न, हल्ला आणि शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. त्याने प्रमोद तांबे नामक व्यक्तीवर प्राणघातक हल्ला चढवला होता. यात त्याला जामीन मिळाला. नंतर त्याने प्रमोदचा मुलगा साहिल तांबे याची ऑगस्ट २०१९ मध्ये गळा घोटून हत्या केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने अजनीत प्रचंड दहशत निर्माण केली होती. आता तो जोशी बापलेकाच्या मागे हात धुवून लागला होता.

----

Web Title: The brutal murder of a notorious criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.